⚡मालवण ता.१५-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या हिंदी विभागामार्फत हिंदी दिनाचे औचित्य साधून हिंदी भाषेच्या प्रसार व प्रचारा साठी ‘हिंदी सप्ताह’ साजरा करण्यात आला. यामध्ये हिंदी पुस्तक प्रदर्शन, हिंदी निबंध स्पर्धा व हिंदी काव्य पाठ स्पर्धा आदी कार्यक्रम पार पडले.
हिंदी दिना निमित्त महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हिंदी कविता सादर केल्या. या काव्य पाठ स्पर्धेचे परीक्षण प्रा.डॉ.उज्वला सामंत यांनी केले. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. ए. ठाकूर, हिंदी विभाग प्रमुख प्रा. हंबीरराव चौगुले, प्रा. के. के. राबते, डॉ. सुमेधा नाईक ,प्रा. एस. सी. बर्वे, प्रा. शिंदे, प्रा. प्रमोद खरात प्रा. संग्रामसिंह पवार व विद्यार्थी उपस्थित होते.
दि. १३ सप्टेंबर रोजी महाविद्यालयात घेण्यात आलेल्या हिंदी निबंध स्पर्धेचा निकाल व पुरस्कार वितरण कार्यक्रमही यावेळी पार पडला. निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक सानिका वायंगणकर (टीवायबीकॉम) हिने पटकावीला. तर द्वितीय क्र.- लक्ष्मी दत्ताराम पारकर (एसवायबीए) व शुभम पवार (टीवायबीकॉम), तृतीय क्र.- कुमारी चैताली केळुसकर व तन्वी दुखंडे तसेच उत्तेजनार्थ – गायत्री आरोलकर, प्रणाली बांदेकर व प्रणाली परब यांनी प्राप्त केला. या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ठाकूर यांच्यासह डॉ. उज्वला सामंत, प्रा. एस. सी. बर्वे यांनी भाषेचे महत्व विशद केले. तर हिंदी विभाग प्रमुख प्रा. हंबीरराव चौगुले यांनी हिंदी भाषेची राजभाषा, राष्ट्रभाषा, संपर्क भाषा तसेच प्रयोजन मूलक भाषा अशी विविध रूपे समजावून सांगत हिंदीचा जगात वाढता प्रसाराबाबत माहिती दिली. प्रास्ताविक डॉ. सुमेधा नाईक यांनी तर सूत्रसंचालन प्रा. खरात यांनी केले. आभार प्रा. राबते यांनी मानले.
