सुरेश पेडणेकर व सुधाकर देवस्थळी यांनी दिली माहिती
⚡कणकवली ता.१५-: बँकांमधील खात्यांमधून निवृत्ती वेतन एकाच दिवशी पूर्वीप्रमाणे जमा केले जाईल याबाबत संबंधित बँक शाखेला योग्य ते आदेश / सूचना करण्याबाबत विनंती करण्यात आली. गट विकास अधिकारी यांनी याची तात्काळ दखल घेऊन संबंधित शाखेला योग्य त्या सूचना देण्याचे मान्य केले अशी माहिती प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात सुरेश पेडणेकर व सुधाकर देवस्थळी यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून सेवानिवृत्त शिक्षकांचे निवृत्ती वेतन प्रणालीद्वारे केले जाते. या प्रणालीचे प्रमुख कारण मधल्या प्रक्रियांना होणारा विलंब टाळणे हा आहे. अलिकडे महाराष्ट्र शासनानेही आपले सर्व शासकीय व्यवहार बँक ऑफ महाराष्ट्रकडे सोपविलेले आहेत. माहे ऑगस्ट २०२३ च्या निवृत्ती वेतनाचे अनुदान संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी २१ ऑगस्टच्या पत्राने जिल्हा परिषदांकडे वर्ग केले. त्यामुळे यावेळी निवृत्ती वेतनासाठी उशीर होण्याचा कोणताही प्रश्न नव्हता. अलिकडे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कणकवलीकडूनही गट विकास अधिकारी पं.स. कणकवली यांचेकडून आवश्यक ते आदेश व कागदपत्र प्राप्त होताच त्याच दिवशी आठही बँकांच्या शाखांमधून जे-जे निवृत्ती वेतन घेणारे खातेदार आहेत त्यांच्या खात्यावर निवृत्ती वेतन त्याच दिवशी सायंकाळी उशिरा ७.३० ते ८.०० वा. पर्यंत जमा केले जात होते.
परंतु माहे ऑगस्ट २०२३ चे निवृत्ती वेतन बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कणकवली यांच्याकडे गट विकास अधिकारी पं.स. कणकवलीकडून आवश्यक ते आदेश व कागदपत्र दि. ०१/०९/२०२३ रोजी देण्यात आले. मात्र कणकवली शाखेने ज्या शिक्षकांची खाती बँक ऑफ महाराष्ट्र शाखांमध्ये आहेत त्या खातेदारांचे निवृत्ती वेतन ०१ तारीखला त्याच दिवशी जमा केले. मात्र ज्या शिक्षकांची अन्य बँकांमध्ये खाती आहेत त्यांचे निवृत्ती वेतन दुसऱ्या दिवशी शनिवारी उशिरापर्यंत जमा केले. हा अन्य बँकेत खाती असणाऱ्या शिक्षकांवर झालेला अन्याय आहे.
यावेळी मात्र बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कणकवली ने अन्य बँकांच्या खातेदारांच्या खात्यांमध्ये उशिरा रक्कम जमा केल्याबद्दल ही बाब उचित नसल्यामुळे गट विकास अधिकारी पं.स. कणकवली यांची सुरेश पेडणेकर व सुधाकर देवस्थळी यांनी समक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. व असा प्रकार पुन्हा होणार नाही व सर्व बँकांमधील खात्यांमधून निवृत्ती वेतन एकाच दिवशी पूर्वीप्रमाणे जमा केले जाईल याबाबत संबंधित बँक शाखेला योग्य ते आदेश / सूचना करण्याबाबत विनंती करण्यात आली. गट विकास अधिकारी यांनी याची तात्काळ दखल घेऊन संबंधित शाखेला योग्य त्या सूचना देण्याचे मान्य केले अशी माहिती प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.
