सर्वांच्या मदतीतून रघुनाथ देसाई सभागृहाचे झालेले नूतनीकरण आदर्शवत…

तहसीलदार वर्षा झाल्टे:तहसील कार्यालयातही दुरुस्ती, नव्या सुविधा व उपकरणे उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्नशील…

⚡मालवण ता.११-: एखाद्या शासकीय इमारतीच्या दुरुस्ती कामासाठी आपण शासकीय निधीची वाट पाहत राहतो. मात्र, शासकीय निधीची वाट न पाहता गटशिक्षणाधिकारी संजय माने यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक व शिक्षक संघटनांच्या देणगीतून मालवण तालुका स्कुलच्या रघुनाथ देसाई सभागृहाचे केलेले नूतनीकरण ही कौतुकास्पद व आदर्शवत बाब आहे. अशाप्रकारे सर्वांनी एकत्र येऊन मदत केल्यास शासकीय इमारतींना उर्जितावस्था येईल, असे प्रतिपादन मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी केले.

मालवण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या रघुनाथ देसाई तालुका स्कुलमधील रघुनाथ देसाई सभागृहाचे नूतनीकरण करण्यात आले असून या सभागृहाचे उदघाटन मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर, जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात, गटशिक्षणाधिकारी संजय माने, शिक्षण विस्तार अधिकारी उदय दीक्षित, आरोग्य विस्तार अधिकारी सुरज बांगर, माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष वामन तर्फे आदी व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी प्रास्ताविक करत सभागृहाच्या नूतनीकरणासाठी केलेले प्रयत्न, त्यासाठी लाभलेली सर्व जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांची व शिक्षक संघटनांची साथ याबाबत माहिती देत मदतीबद्दल सर्वांचे आभार मानले.

तहसील कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी प्रयत्नशील – तहसीलदार

यावेळी तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी शासकीय कामाच्या ठिकाणी वास्तू व वातावरण चांगली असल्यास काम करण्यासही ऊर्जा मिळते, असे सांगत रघुनाथ देसाई सभागृहाच्या नूतनीकरणाच्या धर्तीवर मालवण तहसीलदार कार्यालयाचेही नूतनीकरण करण्याचा मानस व्यक्त केला.

तहसील कार्यालयातही दुरुस्ती, नव्या सुविधा व उपकरणे उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे तहसीलदार झाल्टे यांनी सांगितले.

यावेळी गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर, उपशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात यांनीही विचार मांडले. या कार्यक्रमास शिक्षणाधिकारी प्रदिपकुमार कुडाळकर यांनीही उपस्थिती दर्शवत शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच सभागृहाच्या नूतनीकरणासाठी मदत करणाऱ्या शिक्षक संघटना, शिक्षक, शिक्षण विभागातील कर्मचारी तसेच व्यावसायिक व इतरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक, पंचायत समिती व शिक्षण विभागाचे कर्मचारी, शिक्षक संघटना पदाधिकारी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page