आचरेकर प्रतिष्ठान येथे 12 रोजी मधुसूदन कालेलकर यांच्या आठवणी जागवणार

⚡कणकवली ता.१०-: नाटककार, कथाकार, पटकथाकार आणि गीतकार मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षांचे निमित्ताने वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने त्यांच्या साहित्याचे व्यासंगी अभ्यासक आणि त्यांचे स्नेही श्री रविप्रकाश कुलकर्णी यांचे कालेलकर – लेखक आणि माणूस’ या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. एक तासाचे हे व्याख्यान वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या रंगमंदिरात मंगळवार 12 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता संपन्न होणार आहे.


कोकणातल्या या बहुयामी कलाकाराच्या आठवणी जागवण्यासाठी कणकवलीतील नाट्यप्रेमी व रसिका प्रेक्षकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष ऍड.एन. आर.देसाई यांनी केले आहे.
नाटककार, कथाकार, पटकथाकार आणि गीतकार मधुसूदन कालेलकर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. वेंगुर्ल्यात जन्मलेल्या कालेलकर यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर मराठी नाट्य, चित्रपटसृष्टीत प्रस्थापित होताना हिंदी चित्रपटसृष्टीतही मानाचे स्थान मिळवले. कालेलकर नाट्यनिर्मातेही होते.
अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात्र, दिल्या घरी तू सुखी रहा ही त्यांची काही गाजलेली नाटके. झुमरू, ब्लफ मास्टर, गीत गाता चल अशा काही रौप्यमहोत्सवी हिंदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या. ‘चांदणे शिंपीत जाशी…’ आणि अंगाईगीताचा दर्जा प्राप्त केलेले ‘ निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई… ही गीते कालेलकरांच्या प्रासादिक लेखणीतून अवतरली आहेत.
महाराष्ट्र शासनाची नऊ पारितोषिके मिळवणारे कालेलकर फिल्मफेअर पारितोषिक तसेच ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले गेले.

You cannot copy content of this page