प्रश्न सोडविण्याचे डॉ.सुभोध इंगळे यांचे आश्वासन
⚡दोडामार्ग,ता.१०-: येथील रुग्णालयातील कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन तत्काळ देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या (शिंदे गट) शिष्टमंडळाने ओरोस येथील निवासी वैद्यकीय अधिकारी सुबोध इंगळे यांची भेट घेतली. शासनाकडून त्यांचे मानधन जमा झाले आहे. सोमवारपर्यंत ते त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे डॉ. इंगळे यांनी सांगितले. यावेळी डॉ. तुषार चिपळूणकरही उपस्थित होते.
दोडामार्ग तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळालेल्या रुग्णालयातील विविध प्रलंबीत बाबी लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस व पदाधिकाऱ्यांनी डॉ. इंगळे यांच्याशी चर्चा केली. यावेळी डॉ. इंगळे यांनी महिनाभरात सर्व प्रश्न मार्गी लागणार असल्याची ग्वाही दिली.
दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला आहे. मात्र याठिकाणी असणाऱ्या रुग्णवाहिकेवर चालक नसल्याने रुग्णांना पुढील उपचारासाठी घेऊन जाणे कठीण बनते. त्यामुळे रुग्णवाहिकेवर चालक उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. डॉ. इंगळे यांनी तत्काळ आपल्या विभागाशी संबंधित विषयावर चर्चा करत चालक नियुक्त करण्याचा शब्द दिला. तसेच रुग्णालय व बाहेरील परिसराची स्वच्छता व साफसफाई करण्यासाठी कर्मचारी नसल्याकडे या शिष्टमंडळाने लक्ष वेधले.त्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना डॉ. इंगळे यांनी व्यवस्थापनाला दिल्या. यावेळी जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, तालुका संघटक गोपाळ गवस, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, शहरप्रमुख योगेश महाले, विभागप्रमुख रामदास मेस्त्री आदी उपस्थित होते.