*💫सावंतवाडी दि.०७सहदेव राऊळ-;* मळगाव येथील खानोलकर हॉलमध्ये सिद्ध समाधी योग (एसएसवाय) च्या वतीने पालक सभा आयोजित करण्यात आली होती. या निमित्ताने लहान मुलांसाठी आयोजित केलेल्या योग शिबिराचा सांगता समारंभही कोरोना नियमावलीचे पालन करून पार पडला. यावेळी गोवा येथील सुधाकर गुरुजी, नाबर इंग्लिश स्कूल बांदाच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई, मळेवाड आरोग्य केंद्राचे उमाजी राणे, उर्मिला राणे, नामदेव नाटेकर, प्रकाश दाभोलकर, पालक व मुले उपस्थित होती. सभेच्या सुरुवातीला सिद्ध समाधी योग (एसएसवाय) चे संस्थापक स्व. श्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सुधाकर गुरुजी व मनाली देसाई यांनी आईवडिल हा मुलांचा पहिला गुरू असल्याने मुलांवर चांगले संस्कार कशाप्रकारे करावेत, याबाबत सुंदर मार्गदर्शन केले. तसेच या योग शिबिराच्या माध्यमातून मुलांना कसे घडवले जाते, मुलांच्या अंगभूत गुणांना कसा वाव दिला जातो, खेळाच्या माध्यमातून मुलांना कसे विकसित केले जाते, याबाबत माहिती दिली. यावेळी उपस्थित पालकांनीही योगामुळे आपल्या मुलांमध्ये कशाप्रकारे सकारात्मक बदल झाले, याबाबत आपले अनुभव सांगितले. यावेळी पुढील बॅच १५ जानेवारीपासून सुरू होईल, असे स्पष्ट करण्यात आले. मुलांच्या या योग शिबिरासाठी प्रकाश दाभोलकर यांनी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या सर्व सदस्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. नाश्ता व सरबताची सोय सिद्ध समाधी योगच्या सदस्यांनी केली. नामस्मरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. या संपूर्ण सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मळगाव येथे सिद्ध समाधी योग (एसएसवाय) च्यावतीने पालक सभा व लहान मुलांच्या योग शिबिराचा सांगता समारंभ संपन्न…
