सुरेश बापर्डेकर:दहावी,बारावी,पदवी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार..
मालवण (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात प्रगती साधावी. मात्र प्रगती साधताना आपल्यावर अहोरात्र मेहनत घेणाऱ्या आई वडील व शिक्षकांना विसरू नये, असे प्रतिपादन मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ मुंबईचे उपाध्यक्ष सुरेश बापर्डेकर यांनी केले.
मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ, मुंबई यांच्या वतीने भांडुप येथे कै. सहदेवराव लक्ष्मण शेलटकर सभागृहामध्ये संस्थेचा १०६ वा वर्धापन दिन आणि विद्यार्थी गुणगाैरव सोहळा श्री. सुरेश बापर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी दहावी,बारावी,पदवी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विशेष अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते व रुग्णमित्र श्री. श्रीविद्या सरवणकर आणि नुकतेच हिमाचल प्रदेशातील माऊंट हनुमान तिब्बा सर करणारे मंगेश बाळू कोयंडे यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश बापर्डेकर, कार्याध्यक्ष गणेश बटा, विश्वस्त शंकर पोसम, विश्वस्त चोपडेकर, सौ. सरवणकर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला.
श्रीविद्या सरवणकर यांनी विद्यार्थी आणि पालकांनी शासकीय आरोग्य सेवेचा फायदा जास्तीत जास्त घ्यावा, रक्ताची गरज भासल्यास आपणास संपर्क संपर्क साधावा, असे आवाहन केले. तर मंगेश कोयंडे यांनी हिमाचल प्रदेशातील माऊंट हनुमान तिब्बा सर करताना आलेले अनुभव कथन केले. सुरेश बापर्डेकर यांनी जात प्रमाणपत्र व पडताळणी याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. हर्षा चौगुले यांनी तर सूत्रसंचालन सौ. वीणा शेलटकर, सौ. कांचन मणचेकर , सौ.मृणाली बापर्डेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हरिश्चंद्र वस्त, चंद्रहास केळुसकर, सौ.नम्रता भाबल, सौ.वैशाली सरवणकर, सौ.स्नेहा खवळे, सौ.माधवी जुवाटकर, सौ.मानसी तांडेल, मनोहर केळुसकर, ज्ञानेश्वर कांदळगावकर आदींनी मेहनत घेतली. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि समाज बांधव उपस्थित होते.
