देवगड : प्रतिनिधी देवगड तहसिल कार्यालयाच्या पुरवठा विभागातील अव्वल कारकूनाच्या अंगावर खाजकुली टाकून फरार झालेल्या संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान खाजकुली टाकण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केलेल्या व खाजकुली टाकणाऱ्या अशा दोन्ही संशयितांना देवगड न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार देवगड तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागातील अव्वल कारकून शिवराज यमनूर चव्हाण(३७) यांच्या अंगावर गुरूवारी दुपारी १२.४५ वा.सुमारास अज्ञात व्यक्तिने कार्यालयात कामकाज करीत असताना खाजकुली टाकली. या प्रकाराने महसुल प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान शिवराज चव्हाण यांनी याप्रकरणी देवगड पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीमध्ये खाजकुली टाकण्याची कृती करण्यास येथील त्या व्यक्तींनी या व्यक्तिस प्रवृत्त केले अशी तक्रार देवगड पोलिस स्थानकात दिली. दरम्यान या प्रकरणातील खाजकुली टाकणारा प्रमुख संशयित फरार होता. तपासामध्ये संशयित आरोपीस शनिवारी अटक करून देवगड न्यायालयासमोर हजर केले तर या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपीची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दोघांनाही न्यायालयाने न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. तपास पो.हे.कॉ.शैलेंद्र कांबळे करीत आहेत.
खाजकुली टाकल्या प्रकरणी दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवानगी
