मडुरा दशक्रोशीतील ग्रामस्थांचा निर्णय:सावंतवाडी तहसीलदारांना निवेदन सादर..
⚡बांदा ता.०२-: मडुरा रेल्वे स्थानकावर गणपती स्पेशल गाड्यांना थांबा देण्यासंदर्भात कोरे प्रशासनाने अद्यापपर्यंत कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे मडुरा दशक्रोशीतील ग्रामस्थांनी मंगळवार ५ सप्टेंबर रोजी रेल रोको आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना सादर केले.
मडुरा स्थानकावर सर्व गणपती स्पेशल गाड्यांना थांबा मिळावा. तसेच कोकणकन्या गाडीला थांबा व तुतारी एक्सप्रेस मडुरा स्थानकातून सोडण्याची मागणी केली होती. स्वातंत्रदिनी झालेल्या उपोषणात गणपती स्पेशल गाड्यांना थांबा देण्यासाठी आपण प्रशासन पातळीवर प्रयत्न करु असे आश्वासन तहसीलदार पाटील यांनी दिले होते. त्याचवेळी तशी कार्यवाही न झाल्यास १ सप्टेंबर नंतर थेट रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
अद्यापपर्यंत गणपती स्पेशल सर्व गाड्यांना थांबा देण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे दशक्रोशीत कोरे विरोधात संतापाची लाट पसरली आहे. वारंवार कोरे कडून प्रवाशांची दिशाभूल करण्यात येत आहे. त्यामुळे मंगळवार ५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून कोकण रेल्वे मार्गावरील सर्व गाड्या रोखण्याचा निर्णय झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
आंदोलना दरम्यान होणार्या दुष्परिणामांना कोरे प्रशासन व सावंतवाडी तहसीलदार जबाबदार राहतील असा इशाराही दिला आहे. आता सावंतवाडी तहसीलदार पुढे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
