जिजामाता चौक येथे साडेसात लाखांचा पकडला गुटखा…

स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई:
दोघांना केली अटक..

ओरोस ता १
गोवा मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील ओरोस जिजामाता चौक येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने सात लाख ५३ हजार ९८० रुपये किमतीचा गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आज ताब्यात घेतला. याप्रकरणी गाडी चालक अभय नारायण केसरकर वय ४३ रा. बांदा काळसेवाडी आणि महादेव सुभाष नेवगी वय ३३ रा इन्सुली डोबवाडी यांना अटक केली आहे.
जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला गोवा मुंबई राष्ट्रीय महामार्गावरून कणकवलीच्या दिशेने पहाटे अवैध गुटख्याची बोलेरो गाडीतून वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ कोयंडे, हेड कॉन्स्टेबल प्रकाश कदम, प्रमोद काळसेकर, किरण देसाई, कॉन्स्टेबल यशवंत आरमारकर, यांनी ओरोस जिजामाता चौक येथे सापळा रचत बोलेरो गाडी क्रमांक एम एच ०७ ए जे २८३१ थांबवून गाडीतील दोन इसमांसह वाहन अधिक चौकशीसाठी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात आणले.
यावेळी बोलेरो गाडीची तपासणी केली असता सात लाख ५३ हजार ९८० रुपये किमतीचे गुरखा व सुगंधित तंबाखू जन्य पदार्थ मिळून आले. त्यामुळे गाडी चालक संशयित आरोपी अभय केसरकर आणि महादेव नेवगी यांचे विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत तरतुदी नुसार कायद्याचा भंग केल्यामुळे सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर हे करीत आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

फोटो ओळ:- सिंधुदुर्गनगरी: अवैध गुटखा वाहतूक करताना पकडलेल्या संशयित आरोपींसह कारवाई करणारे स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पथक

You cannot copy content of this page