सिंधुदुर्ग किल्ल्यातील राधाबाई सकपाळ यांचे निधन

⚡मालवण ता.०१-:
मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यातील रहिवासी राधाबाई गोविंद सकपाळ (वय ८१) यांचे निधन झाले.

राधाबाई सकपाळ यांनी आपले बहुतांश आयुष्य हे किल्ल्यातच ‘व्यतित केले होते. ठराविक कौटुंबिक समारंभ आणि वैद्यकीय उपचारांखातर त्या किल्ल्याबाहेर जायच्या. किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात सकाळी आणि सायंकाळी असा दिवसातून दोनवेळा नैवेद्य दाखविला जातो. या नैवेद्याची जबाबदारी सकपाळ कुटुंबीय नित्यनियमाने पार पाडतात. राधाबाई मोठ्या उत्साहाने ही सेवा बजावत असत.

निधनानंतर होडीतून त्यांचे पार्थिव स्मशानभूमीत आणण्यात आले. मालवण दांडी आवार येथील सोमवार पेठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिवराजेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी सकपाळ यांच्या त्या मातोश्री होत.

You cannot copy content of this page