रानभाजीत वर्षा धोंड तर वनौषधी ओळखमध्ये सावरेश्वर बचत गट प्रथम

⚡वेंगुर्ला ता.३०-: आवेरे ग्रामस्थ आणि आवेरे-तेंडोली जिल्हा परिषद शाळा यांनी आयोजित केलेल्या रानभाजी पाककला आणि वनौषधी ओळख स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रानभाजी पाककृती स्पर्धेत वर्षा यशवंत धोंड यांनी सादर केलेल्या ‘भरलेली कंटोळी‘ या पाककृतीने तर, वनौषधी ओळख स्पर्धेत सावरेश्वर महिला बचत गट आवेरेने प्रथम क्रमांक प्राप्त केला.

  आवेरे-तेंडोली जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन तेंडोली सरपंच अनघा तेंडुलकर व उपसरपंच संदेश प्रभू यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आकाश मुणनकर, दिलीप राऊळ, सुधा राऊळ, माजी सरपंच मंगेश प्रभू, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अश्विनीकुमार मांजरेकर, शाळेचे मुख्याध्यापक हृदयनाथ गावडे, सहाय्यक शिक्षक भानू गोसावी आदी उपस्थित होते.

  रानभाजी पाककृती स्पर्धत २९ महिलांनी सहभाग घेतला. यात प्रथम-वर्षा यशवंत धोंड (भरलेली कंटोळी), द्वितीय-जाई सुनिल नाईक (एक पानाची वडी व लाजरीची भाजी), तृतीय-पाटेश्वर महिला बचत गट (दुदरल्याची वडी व चुरण पानाची भाजी), उत्तेजनार्थ-वैशाली विनोद दुतोंडकर (कंटोळी कटलेट) यांनी क्रमांक पटकाविले. तर वनौषधी ओळख स्पर्धेतही महिलांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. यात २९ प्रकारच्या वनौषधीची ओळख करून देणा-या सावरेश्वर बचत गटाने प्रथम, ४० वनौषधी सादर करणा-या कमळेश्वर महिला बचत गटाने द्वितीय, प्रमोदिनी प्रभाकर आसोलकर यांनी तृतीय तर वर्षा यशवंत धोंड यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला.

  या दोन्ही स्पर्धांचे परीक्षण पत्रकार तथा शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्थेचे सचिव महेंद्र मातोंडकर यांनी केले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण खानोली-नाईकवाडी येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील नाईक व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धेसाठी अवी दुतोंडकर, रतन धुरी, राजू बाळोजी, सुनिल सावंत, आनंद सातार्डेकर, विनोद दुतोंडकर, सत्यवान दुतोंडकर, प्रसाद सातार्डेकर, राजू वाडेकर, समीर केळुसकर, दिपक वराडकर, अक्षय सातार्डेकर यांचे सहकार्य लाभले.
You cannot copy content of this page