नवभारत साक्षरता सर्वेक्षण सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचा बहिष्कार:वामन तर्फे

⚡कणकवली ता.२९-: नवभारत साक्षरता सर्वेक्षण अंतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण आणि साक्षरता कार्यक्रम शिक्षकांकडून राबविण्याचे चुकीचे धोरण शासन राबवित आहे, याकरीता सिंधुदुर्ग जिल्हा माध्य. व उच्च माध्य.शाळा मुख्याध्यापक संघ, सिंधुदुर्ग सदर कार्यक्रमावर बहिष्कार जाहीर करीत आहे.सदर निर्णय कार्यकारिणी सभेत नुकताच घेण्यात आला असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे आणि सचिव गुरुदास कुसगांवकर यांनी सांगितले आहे.

राज्यातील शाळा शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे आधिच मोडकळीस आलेल्या आहेत, शाळेत अनेक वर्षापासून शिक्षकांची भरती नाही परिणामी विद्यार्थ्यांना शिकवायला पुरेसे शिक्षक नाहीत. दोन शिक्षकांचा प्रभार एकाच शिक्षकाकडे असल्याने कामाचा ताण अधिक आहे. शाळेतील अशैक्षणिक कामे संपता संपत नसतांना आता नवभारत साक्षरता हा अशैक्षणिक कार्यक्रम सुद्धा शिक्षकांवर लादण्यात आलेला आहे. शासनाला आमच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यात रस नाही अशी शंका निर्माण होत आहे. याकरीता शासनाने शिक्षकांना केवळ विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम द्यावे, या विनंती सह नवभारत साक्षरता या कार्यकमावर सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघ बहिष्कार टाकत आहे.
याबाबत पत्र शिक्षणाधिकारी (माध्य.), शिक्षणाधिकारी (प्राथ.) शिक्षणाधिकारी (योजना), जि. प. सिंधुदुर्ग यांना देण्यात येणार आहे.शाळाबाह्य अनियमित स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करण्यासंदर्भात शासन स्तरावरून परिपत्रक काढले आहे. सर्वेक्षण झाल्यानंतर दररोज त्या विद्यार्थ्यांची लिंक भरण्याचे काम देखील शिक्षकांकडे सोपविण्यात आले आहे. तर नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याची देखील जबाबदारी देण्यात येत आहे. सध्या शिक्षकांची भरती नसल्यामुळे रिक्त शिक्षकांचा अतिरिक्त कार्यभार इतर शिक्षकांकडून पूर्ण करणे गरजेचे आहे. कारण विद्यार्थांचा अभ्यासक्रम हा पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे. मूल्यमापन, अंतर्गत चाचणी, अभ्यासक्रम पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे.तसेच अनेक विद्यालयात मुख्याध्यापक, लिपीक शिपाई सुद्धा नाहीत तेही काम एखाद्या शिक्षकांना सोबत घेऊन पूर्ण करणे आवश्यक आहे.असे एक ना अनेक समस्या सध्या अनेक मुख्याध्यापक यांचेसमोर आहे. अशातच शाळाबाह्य कामे आपल्यावर सोपवल्यास आपण कोणती कामे प्राधान्यक्रमाने करावीत, हा प्रश्न उपस्थित होतो आहे. करीता ही शाळाबाह्य कामे शिक्षकांना देऊ नयेत, असे अनेक वेळा मुख्याध्यापक संघाने वरिष्ठ अधिकारी यांना निवेदनाच्या माध्यमातून कळविण्यात आले आहे. तरी देखील वरिष्ठ पातळीवरुन पत्र निघाले.शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र नंबर वन बनविण्याचे एकीकडे शासनाकडून सांगितले जाते आणि दुसरीकडे शिक्षकांना शाळाबाह्य कामे देऊन अध्यापनापासून वंचित ठेवले जाते.त्यातच शिक्षक शिक्षकेतर भरती बाबतीत नुसती आश्वासने दिली जातात.आमच्या दृष्टीने विद्यार्थी हा घटक महत्त्वाचा आहे.त्याला योग्य शिक्षण मिळाले पाहिजे.त्यामुळे या पत्राचा विचार न करता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्याध्यापक.संघाने या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे आणि सचिव गुरुदास कुसगांवकर यांनी सांगितले आहे.

You cannot copy content of this page