आठ दिवसात न बदलल्यास आंदोलनाचा इशारा
⚡बांदा ता.२७-: सातोसे गावातील वीजेचे बहुतांश लोखंडी पोल गंजल्याने धोकादायक स्थितीत उभे आहेत. महावितरण कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करुनही नवीन पोल उभे करण्याबाबत कोणतीही कार्यवाही केली जात नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. येत्या आठ दिवसात नवीन पोल उभे न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी सरपंच बबन सातोसकर यांनी दिला आहे.
सातोसे गावात बरेच लोखंडी वीजेचे खांब असून बरीच वर्षे ते बदलण्यात आलेले नाहीत. पूर्णपणे गंजल्याने ते केव्हाही कोसळतील अशा अवस्थेत आहेत. त्यामुळे गावात दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय विद्युत वाहिन्यांवरील झुडपांची सफाई न केल्याने गावात सतत वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार पावसाळ्यात होत असतात.
सातोसे माजी सरपंच बबन सातोसकर यांनी महावितरणचे अधिकारी तसेच वायरमन यांना सदर पोल बदलण्यासाठी वारंवार सूचना केल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. भविष्यात गंजलेले पोल कोसळून दुर्घटना झाली तर जबाबदार कोण ? असा सवाल सातोसकर यांनी उपस्थित केला आहे. येत्या आठ दिवसात पोल बदलण्याची कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा सातोसकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने दिला आहे.
