ठाकरे सेनेचे अमित राणे यांचा आरोप:तलाठी परीक्षा केंद्र, डीएडचा प्रश्न, बेरोजगार युवकांच्या प्रश्नांवर तुमची तोंड बंद का असतात.. ?
कुडाळ, प्रतिनिधी
भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या पदाधिकाऱ्यांकडून कुडाळ तालुक्यातील विकासकामांवरुन एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सुरू आहे. ठाकरे गटाचे कुडाळ शहर समन्वयक अमित राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांवर टीकास्त्र सोडताना, जनाची नाय निदान मनाची लाज बाळगा !
तलाठी परीक्षा केंद्र, डीएडचा प्रश्न, बेरोजगार युवकांच्या प्रश्नांवर तुमची तोंड बंद का असतात ? तेव्हा प्रभाकर सावंत, दादा साईल आणि त्यांचे नेते कुठल्या बिळात होते ? असा कडक सवाल करताना युवासेना कुडाळ शहर समन्वयक अमित राणे यांनी भाजपवर बोचरी टीका केली आहे.
हो चंद्रयान ३ चा प्रस्ताव आम्हीच पाठवला होता. तीन नागोबाना चंद्रावर पाठवायचे होते. परंतु, चंद्राकडून एरर आला. चंद्राने पण घाण नको म्हणून तीन नागोबा फेकून दिले. तीन नागोबा होते म्हणून नाव पण चांद्रयान ३ अस नाव दिले, अशी टीका केली आहे.
अमित राणे म्हणाले की, कुडाळ आगारासाठी आलेल्या एसटी बस आमदार वैभव नाईक यांच्याच पाठपुराव्यामूळे आल्यात. ठाकरे सरकारच्या कार्यकाळात पाठपुरावा केला होता. फक्त त्या बसेस डेपोला दिल्या नव्हत्या. तुम्ही वाटल्यास वेळ ठिकाण ठरवा, आम्ही सिद्ध करून दाखवू, असे आव्हान अमित राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
दादा साईल गावात ठोकतात म्हणून तालुक्यात ठोकू नये, माहिती घेऊन बोलावे. दादा साईल हे चर्चेत राहण्यासाठी वरिष्ठांना खुश करण्यासाठी काहीही बरळत आहेत. तर प्रभाकर सावंत यांनी महिती घेऊन बोलावे उगाच कॉपी पेस्ट बातम्या करण्यापेक्षा अभ्यास करून बोलावे, अशीही टीका अमित राणे यांनी केली आहे.
दादा साईल हे डीएडवाल्यांचे फोन का उचलत नाहीत ?, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे.
कितीही प्रयत्न केलात तरी कुडाळ-मालवणचे आमदार हे वैभव नाईकच असतील. भाजप हे स्वतःच्या लोकांचे प्रवेश घेऊन वातावरण निर्मिती करत आहे. पैशाचे आमिष, फोडाफोडीचे राजकारणात भाजप अव्वल आहे, अशी टीका सुद्धा अमित राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांवर केली.
