हरी खोबरेकर:निवडणुका जवळ आल्याने सुरू केलीय पोपटपंची..
मालवण (प्रतिनिधी)
गणेश चतुर्थीपूर्वी भाजपमध्ये १० ते १२ मोठे पक्षप्रवेश होतील व आम. वैभव नाईक यांच्या घागरीला गळती लागेल, असे सांगणाऱ्या दत्ता सामंत यांची केवळ निवडणुका जवळ आल्यावर पोपटपंची सुरु आहे. आमचे शिवसैनिक कट्टर आहेत. भाजपचेच कार्यकर्ते सक्षम नसल्यामुळेच दत्ता सामंत यांना शिवसेनेच्या सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी यांचे उंबरठे झीजवावे लागत असून हे त्यांचे अपयश आहे. निलेश राणे हे आमदारकीचे उमेदवार असल्याचे सांगून मागाहून निलेश राणे यांच्या विरोधात कुटील कारस्थाने करण्याचे काम दत्ता सामंत करत आहेत. गत विधानसभा निवडणुकी प्रमाणेच यावेळीही दत्ता सामंत यांच्या भ्रमाची हंडी फोडून भगवा फडकवल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
मालवण येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत तालुकाप्रमुख हरी खोबरेकर हे बोलत होते. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, गणेश कुडाळकर, महेश जावकर, महेंद्र म्हाडगुत, उमेश मांजरेकर, सन्मेष परब, महिला आघाडी तालुकाप्रमुख दीपा शिंदे, युवतीसेना तालुकाप्रमुख निनाक्षी मेतर, नरेश हुले, प्रसाद आडवणकर, हेमंत मोंडकर, वैभव खोबरेकर, उमेश चव्हाण, गौरव वेर्लेकर, चंदू खोबरेकर, करण खडपे, अक्षय रेवंडकर आदी उपस्थित होते.
यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, आपण अनेक कार्यकर्त्यांना भेटतो, त्यांचे भाजप मध्ये प्रवेश घेऊ, असे दत्ता सामंत सांगतात. मात्र, दत्ता सामंत व भाजप पदाधिकारी हे गावागावात जाऊन मंदिरांमध्ये राजकारण करत आहेत. बँकेत कर्ज असलेल्या कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात, जिल्हा बँकेचे कर्ज घेऊन देतो असे सांगतात. मात्र शिवसेनेचा कार्यकर्ता हा कट्टर आहे. शिवसेना सरपंच – उपसरपंचांच्या बैठकीत सर्वांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनविण्याचा निर्धार केला. आमदार वैभव नाईक यांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. भाजपने ५० टक्के सवलतीच्या योजना आणण्यापेक्षा महागाई कशी कमी होईल हे पहावे. गॅस सिलेंडर, खते, पेट्रोल व इतर इंधने यांच्या किमतीत ५० टक्के कपात केल्यास जनता अभिनंदन करेल. चांगली भूमिका घेतली म्हणून आम्हीही स्वागत करू, असा टोलाही खोबरेकर यांनी लगावला.
दत्ता सामंत यांची रोजी रोटी ही आम. वैभव नाईक यांनी आणलेल्या निधीवरच सुरु आहे. भाजप महासागर असल्याचे सांगायचे, मात्र भाजप कार्यकर्तेच सक्षम नसल्याने सामंत यांना दुसऱ्यांचे उंबरठे झीजवावे लागत आहेत. दत्ता सामंत यांनी १० – १२ पक्षप्रवेशाची विधाने खुशाल करावीत. हे आकडे त्यांनाच शुभ लाभ ठरो, तुम्ही बारावे घातलात तर आम्ही तेरावे घालू असा इशाराही हरी खोबरेकर यांनी दिला.
