देवबाग सरपंच उल्हास तांडेल:२७ पासून होणाऱ्या यात्रेला सर्वपक्षीय मिळतोय पाठिंबा..
मालवण (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यातील मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक यांच्या समस्या जाणून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शासनाला एक परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या उद्देशाने माजी खासदार ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांच्या संकल्पनेखाली व मार्गदर्शनाखाली आचरा संगम ते देवबाग संगम या मालवण किनारपट्टी मार्गावर सागरी परिक्रमा यात्रा दि. २७ ते २९ ऑगस्ट या कालावधीत काढण्यात येणार आहे. या यात्रेमुळे किनारपट्टीवरील मच्छिमारांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून मच्छीमारांबरोबरच सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संस्था, मच्छिमार संस्था यांचा पाठिंबा यात्रेला मिळत आहे, असे देवबागचे सरपंच उल्हास तांडेल यांनी सांगत या यात्रेनंतर जिल्ह्यात देवगड व वेंगुर्ला तालुक्याच्या किनारपट्टीवर देखील सागरी यात्रा काढण्याचा आमचा मानस आहे, असे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
मालवण देऊळवाडा येथील सागरी महामार्ग येथील हॉटेल रामेश्वर याठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत उल्हास तांडेल बोलत होते. यावेळी शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, जिल्हा सचिव किसन मांजरेकर, मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, उपतालुकाप्रमुख पराग खोत, शहरप्रमुख बाळू नाटेकर, डॉ. दिपक सावंत, पर्यटन व्यावसायिक महासंघाचे मालवण तालुकाध्यक्ष मंगेश जावकर, मच्छिमार नेते दिलीप घारे आदी उपस्थित होते.
या सागरी यात्रेचा शुभारंभ दि. २७ रोजी सकाळी ९.३० वा. आचरा येथील श्री देव रामेश्वर मंदिर येथून होणार आहे. त्यानंतर आचरा संगम याठिकाणी मच्छीमारांची सभा होऊन जामडूल, हिर्लेवाडी, वायंगणी, तोंडवळी, तळाशिल याठिकाणी भेटी देण्यात येणार आहेत. २८ रोजी सर्जेकोट, कोळंब, मालवण धुरीवाडा याठिकाणी सभा होणार आहेत. २९ रोजी वायरी, तारकर्ली आणि देवबाग याठिकाणी सभा घेण्यात येणार आहेत. देवबाग येथे जाहीर सभा होवून यात्रेची सांगता होणार आहे, अशी माहिती उल्हास तांडेल यांनी दिली.
मच्छिमारांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठीच ही सागरी यात्रा आयोजित केली असून यात कोणतेही राजकारण नाही. ही यात्रा केवळ शिवसेनेची नसून यात सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, सामाजिक संस्था, मच्छिमार संस्था यांनाही निमंत्रित केले असून सर्वांनी यात सहभागी व्हावे. किनारपट्टीवरील गावात भेटी दरम्यान या यात्रेसाठी मच्छीमारांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसून आले. या यात्रेत मच्छिमारांनी आपले प्रश्न मांडावेत, असे आवाहन यावेळी उल्हास तांडेल यांनी केले.
