बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी डॉ. गजानन सारंग यांची तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक…

आमदार नितेश राणे यांचे प्रयत्न; उपसरपंच जावेद खतीब यांची माहिती..

बांदा/प्रतिनिधी
आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी डॉ. गजानन सारंग यांची तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. सारंग हे मोरगाव आरोग्य केंद्रात कार्यरत असून त्यांना तात्काळ बांद्यात हजर होण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिले आहेत. ही माहिती उपसरपंच जावेद खतीब यांनी दिली.

वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांची भेडशी येथे बदली झाल्यानंतर गेले दीड महिने येथील पद रिक्त होते. यासंदर्भात बांदा उपसरपंच जावेद खतीब, भाजप शहर अध्यक्ष बाबा काणेकर यांनी आमदार राणे यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले होते. आमदार राणे यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
येथे एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्याची गरज असल्याचे भाजपच्या शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार डॉ. गजानन सारंग यांची नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. सारंग यांची नुकतीच भेडशी येथून मोरगाव येथे प्रशासकीय बदली झाली होती. आता त्यांच्याकडे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. आमदार राणे यांनी तात्काळ दखल घेत वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपसरपंच खतीब यांनी आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page