सिगेट कंपनीच्या सहयोगातून मावळ तालुक्यातील २१ गरजू महिलांना व्यवसायाची संधी..
⚡बांदा ता.२१-: कोकण कला व शिक्षण विकास संस्था महिला सक्षमीकरण या विषयावर गेले अनेक वर्षे काम करत असून महिला सबळ झाल्यास कुटुंब सक्षम होऊ शकते या उद्देशाने महाराष्ट्रात काम करत आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ या तालुक्यात आतापर्यंत संस्थेने शेकडो महिलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले असून त्यातील २१ गरजू महिला सिगेट कंपनीच्या माध्यमातून शिलाई स्कूल प्रकल्पांतर्गत २ महिने टेलरिंग आणि फॅशन डिझायनिंगचे उच्च दर्जाचे ट्रेनिंग, व्यक्तीमत्व विकास, खरेदी विक्री कौशल्य, स्वयंरोजगार आणि व्यवसाय वृद्धी असे अनेक कौशल्य देऊन त्यांनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी महिलांना शिलाई मशीन व किट उपलब्ध करून देण्यात आले.
रिंकू सभागृह, कामशेत येथे झालेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. काल झालेल्या कार्यक्रमात प्रत्येक महिलेला शिलाई मशीन मशीन, किट व सर्टिफिकेटचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी बिसलरी कंपनीचे मानव संसाधन व्यवस्थापक श्री विठ्ठल कुंभार, कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, कोकण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक बापू माने, प्रीती पांगे, साक्षी पोटे, बिना अहिरे व शिक्षिका सौ वृंदा बालगुडे आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कोकण संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून मावळवासीयांच्यावतीने मी संस्थेचे आभार मानतो अशा शब्दात श्री प्रदीप पवार यांनी संस्थेच्या कामाची स्तुती केली.
सिगेट कंपनी आणि कोकण संस्थेच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचे आम्ही सोनं करून आपल्या कुटुंबाचा, समाजाचा आणि पर्यायाने मावळ तालुक्याच्या विकासात योगदान देऊ असे आश्वासन लाभार्थी प्रियांका काजळे यांनी यावेळी सर्वांच्या वतीने दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बापू माने यांनी केले.
