⚡मालवण ता.१७-: राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५ व्या स्वातंत्र्य दिनी देशातील गरीब जनतेला पौष्टिक धान्य उपलब्ध करून देण्याबाबत घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत मालवण तालुक्यातील प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना व अंत्योदय अन्न योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मालवणच्या तहसीलदार वर्षा झालटे यांनी केले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यातील राबविण्यात येणाऱ्या लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गुणसंवर्धीत तांदूळ पोषणात्मक वितरित करण्याबाबतच्या योजनेस केंद्रीय आर्थिक व्यवस्थापन समितीने ७ एप्रिल २०२२ रोजीच्या बैठकीत मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार केंद्र शासनाने मार्च २०२४ पर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभार्थ्यांना फोर्टीफाईड तांदूळ ‘वितरित करण्यास मंजुरी दिली आहे, त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत लाभार्थ्यांनी धान्याचा लाभ घ्यावा, असे तहसीलदार झाल्टे यांनी म्हटले आहे.
