⚡मालवण ता.१४-: ‘साधना रिसोर्सेस अँड एडवायजरी फाऊंडेशन आचरा’ या संस्थेच्या वतीने ओझर विद्यामंदिर, कांदळगाव या प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक गोळ्या व औषधांचे वाटप करण्यात आले.
यावेळी साधना रिसोर्सेस अँड एडवायजरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. सुचेता नाईक यांनी परिचारिका सुवर्णा देऊलकर व चेतना जाधव यांच्या साथीने ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांची व शिक्षकांची आरोग्य तपासणी केली. तसेच डॉ. नाईक यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला तपासणी करताना आरोग्याच्या काळजी घेण्याविषयी वैयक्तिक मार्गदर्शनही केले.
हे आरोग्य तपासणी शिबिर ओझर विद्यामंदिरमध्ये आयोजित करण्यासाठी शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे यांनी विशेष मेहनत घेतली. या शिबिरासाठी ‘साधना रिसोर्सेस अँड एडवायजरी फाऊंडेशन, आचरा’ संस्थेचे संचालक स्वप्नील तावडे, जिल्हा समन्वयक उमेश सावंत उपस्थित होते. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी कमीतकमी खर्चात उपचार करण्यासाठी संस्थेच्या वतीने भविष्यात हॉस्पिटलची उभारणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशालेमध्ये शिबिराच्या आयोजनाबद्दल ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी साधना संस्थेचे आभार मानले. यावेळी ओझर विद्यामंदिरचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
