⚡मालवण ता.१४-: भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता सोहळा संपूर्ण देशभर साजरा केला जात असून मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य सोहळ्याचे ७६ फुट लांबीचे चित्र बालकलाकारांनी साकारत अनोख्या पद्धतीने सांगता सोहळा साजरा केला. विद्यार्थ्यांनी केवळ दोन तासांमध्ये पूर्ण केले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्र राज्यातील एवढ्या लांबीचे चित्र प्रथमच साकारलेले असल्याचा दावा करण्यात आला आहे.
हे चित्र साकारण्यासाठी प्रशालेतील इयत्ता आठवी ते बारावी तसेच माजी विद्यार्थी व वराडकर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक संजय नाईक व कलाशिक्षक समीर चांदरकर यांचे मार्गदर्शन लाभले. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संयुक्त कट्टाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
