नागरिकांत भीतीचे वातावरण
मालवण (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यातील श्रावण गावात जोगण व कुपेरी परिसरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आठ ते दहा गवारेड्यांचा कळप ग्रामस्थांना दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. गवारेड्यांच्या भीतीपोटी शेतकरी, मोलमजुरी करणाऱ्या मजुरांच्या जीवाला धोका आहे. याची दखल वन अधिकाऱ्यांनी वेळेत घेऊन लोकांच्या जीवाचे संरक्षण करावे, अशी तेथील ग्रामस्थांची मागणी आहे.
श्रावण व गवळीवाडी स्टॉप यांच्यात असलेल्या ‘इडी’च्या ओढ्यावरून हा गवारेड्यांचा कळप गवळीवाडीच्या दिशेने मार्गस्थ झाला. या गवारेड्यांपासून ग्रामस्थांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. गवारेडे सिंधुदुर्गात प्रत्येक गावागावात पोहोचल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. शासनाने गवा रेड्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अन्यथा या प्राण्यांपासून सर्वसामान्यांच्याही जीवाला धोका निर्माण होईल, असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
