बांद्यात मेरी मिट्टी मेरा देश अभियान राबवणार

शहरातील उद्यानात वृक्षारोपण करण्याचा विशेष ग्रामसभेत निर्णय

बांदा/प्रतिनिधी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमातंर्गत केंद्राच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान राबविण्याबाबत आज बांद्यात आयोजित विशेष ग्रामसभेत नियोजन करण्यात आले. शहरात अटलबिहारी वाजपेयी उद्यान यवथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्याचे ठरवण्यात आले.


सरपंच प्रियांका नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात विशेष ग्रामसभा संपन्न झाली. यावेळी मंचावर उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, रत्नाकर आगलावे, शामसुंदर मांजरेकर, प्रशांत बांदेकर, रेश्मा सावंत, शिल्पा परब, रुपाली शिरसाट, श्रेया केसरकर, तनुजा वराडकर, दिपलक्ष्मी पटेकर, रिया येडवे, देवल येडवे, ग्रामविस्तार अधिकारी लीला मोर्ये आदी उपस्थित होते.
सुरूवातीला प्रशासनाकडून कार्यक्रमाची रूपरेषा आणि शासनाच्या मार्गदर्शक सुचनांची माहिती ग्रामविस्तार अधिकारी श्रीमती मोर्ये यांनी दिली. त्यानुसार १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत मागील वर्षाप्रमाणे ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवून प्रत्येक घरोघरी राष्ट्रीय ध्वजवंदन करण्याबाबत आवाहन करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्यावर शहरातील उद्यान येथे वसुधा वंदन म्हणून विविध देशी प्रजातीच्या ७५ रोपट्यांची १४ ऑगस्ट रोजी लागवड करून ‘अमृतवाटिका’ तयार करण्यात येणार आहे. याबाबत शासनाच्या सुचना असल्याने त्या अनुषंगाने सभेत चर्चा करण्यात आली. झाडे कोणती असावीत यावरही चर्चा झाली. याच ठिकाणी शिलालेखाचे देखील अनावरण करण्यात येणार आहे.
स्वातंत्रदिनी विविध कार्यक्रम घेण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी काही सूचना मांडल्या. १५ रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे हातात पणती घेऊन ध्वजला मानवंदना देण्यात येणार आहे. यावेळी शहरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच श्रीमती नाईक यांनी केले.

You cannot copy content of this page