बंद स्ट्रीट लाईट,हायमास्ट सुरु करण्यासाठी ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

मालवण नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिली पंधरा दिवसांची डेडलाईन

⚡मालवण ता.०८-: मालवण नगरपरिषद हद्दीतील मार्गावरील अनेक स्ट्रीट लाईट बंद स्थितीत आहेत. मुख्य चौक, नाक्यांवर बसविण्यात आलेले हायमास्ट टॉवरही बंद असून १५ दिवसात या लाईट सुरु न केल्यास नागरिकांसमवेत नगरपरिषद कार्यालया समोर आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालवण शहर तर्फे मालवण नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना देण्यात आले. पावसाळा कालावधी असल्याने साचणारे पाणी, रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी, खड्डेमय मार्ग यांचा विचार करता पादचारी व सायकल चालक यांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच आगामी काळातील सण उत्सव यांचा विचार करता बंद स्ट्रीट लाईट, हायमास्ट टॉवर लवकरात लवकर सुरू करणे आवश्यक आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे मालवण शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहर प्रमुख सन्मेष परब, उपशहर प्रमुख यशवंत गावकर, तपस्वी मयेकर, युवासेना पदाधिकारी सिद्धेश मांजरेकर, उमेश चव्हाण, सिद्धू जाधव, युवतीसेना तालुका प्रमुख निनाक्षी शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते

You cannot copy content of this page