हेवाळे ग्रामस्थांची विद्यार्थ्यांसह गटशिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक..
⚡दोडामार्ग,ता.०८-: आणखी एका शिक्षकाच्या मागणीसाठी हेवाळे ग्रामस्थांनी मंगळवारी (ता.८) गटशिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.यावेळी त्यांनी शाळा क्रमांक एक मधील मुलांनाही सोबत आणून कार्यालयात बसवले.आम्हाला आणखी एक शिक्षक द्या नाहीतर शाळाच बंद करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
आपल्या चुकीमुळे मराठी शाळा बंद पडत आहेत.शिक्षक नसल्याने पालक विद्यार्थ्यांना जवळच्या माध्यमिक शाळेत घालत आहेत.आमच्या शाळेतील मुलेही त्यामुळेच कमी झालीत.आपण शिक्षक द्या, नाहीतर शाळाच बंद करा असा पवित्रा त्यांनी घेतला.
यावेळी प्रभारी गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ,प्रभारी विस्तार अधिकारी दीपा दळवी, साटेली भेडशीचे केंद्रप्रमुख सूर्यकांत नाईक आदी उपस्थित होते.
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीमुळे सगळीकडे हीच स्थिती आहे १३ शाळा शिक्षकांविना आहेत. त्यांच्यावर शिक्षक पाठवावे लागत आहेत.शिवाय कित्येक शाळांमध्ये पटसंख्या २५ ते ५० पर्यन्त असूनही एकच शिक्षक आहे.त्यामुळे मी शिक्षक कुठून देऊ,मी हतबल आहे अशी बाजू श्री.नदाफ यांनी मांडली.त्यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला.शेवटी आपण एक विषयतज्ज्ञ आठवड्यातून दोन दिवस आपल्या शाळेवर पाठवतो असे सांगितले.
यावेळी सरपंच साक्षी देसाई,भाऊसाहेब देसाई,शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख संजय गवस,तालुका संघटक मदन राणे,गुरू ठाकूर आणि बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
