फसवणूक टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा विचारपूर्वक वापर करा

प्रवीण कोल्हे: युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन..

⚡मालवण ता.०७-: आधुनिक काळामध्ये इंटरनेट हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला असून पदोपदी इंटरनेटचा वापर सध्या सुरु आहे. मात्र, आजही इंटरनेटच्या अपुऱ्या ज्ञानामुळे आपली फसगत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करा असे प्रतिपादन मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी येथे बोलताना केले.

महिला व बालविकास विभागाच्या वतीने राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच मालवणच्या भंडारी ज्युनिअर कॉलेजमध्ये घेण्यात आला त्यावेळी मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. शुभांगी जोशी, भावना ठाकूर, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एच. बि. तिवले सर, प्रा. पवन बांदेकर, ललित चव्हाण, श्रीमती. सुनंदा वराडकर , सौ शेर्लेकर सौ वाक्कर आदी उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य तिवले यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर प्रा. पवन बांदेकर यांनी प्रास्ताविक केले.

या प्रशिक्षणात महिला व मुलींवरील अत्याचार या विषयावर बोलताना डॉ. शुभांगी जोशी यांनी अलीकडच्या काळात महिला व मुलींवर क्रूर हिंसाचार व त्यातून त्यांची केली जाणारी हत्या हे समाजा समोरील एक मोठे आव्हान असून त्यांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. ही उपाययोजना आखताना महिलांनी आपले व्यक्तिमत्व जपले पाहिजे तर कुमार वयीन मुलींनी आपल्या टिन वयात चारित्र्य घडविण्याच्या दृष्टीने चांगल्या सवयी आणि चांगले ज्ञान ग्रहण केले पाहिजे असे सांगितले. शेवटी सौ. वाक्कर यांनी आभार मानले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विध्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिके कुमारी भावना ठाकूर व ललित चव्हाण यांनी दिल्या .

You cannot copy content of this page