कोनाळ येथील
सुरेश बांदेकर यांची तहसीलदारांकडे मागणी
⚡दोडामार्ग ता.०६-: कोनाळ येथील रेशनिंग धान्य दुकान बचत गटांना चुकीच्या पध्दतीने देण्यात येत असल्याने त्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे सचिव सुरेश बांदेकर यांनी येथील तहसीलदारांकडे केली आहे. योग्य शासकीय प्रक्रिया करुनच रेशनिंग धान्य दुकान बचतगटास देण्यात यावे असेही त्यांनी त्या अर्जात म्हटले आहे.
त्यांनी अर्जात म्हटले आहे, सध्या कोनाळ गावात असणारे रेशनिंग धान्य दुकान संजय गवस योग्यरित्या चालवत आहेत. आता बचत गटांना दुकान चालवण्यासाठी देण्याची प्रक्रिया चालू आहे. तशी मागणी बचतगटाने केली आहे. कोनाळ गावामध्ये चर्मकार समाज, आदिवासी समाज (ठाकर समाज) व इतर समाज आहेत. त्यांचेही बचतगट दारिद्रय रेषेखालील आहेत. रेशनदुकान बचतगट यांना चालविण्यास देण्यास माझा विरोध नाही; पण जी प्रक्रिया व्हायला पाहिजे ती झालेली नाही. सदर विषयाचा ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यात आलेला नाही किंवा तलाठी कार्यालयाजवळ सदर विषयाची नोटीस किंवा कोणालाही कल्पना देण्यात आलेली नाही. तो निर्णय परस्पर घेण्यात आलेला आहे.त्यामुळे त्या निर्णयाला स्थगिती देवून पुन्हा जाहीरनामा परिपत्रक काढून गावातील संपूर्ण वाडीला संधी देण्यात यावी असेही म्हटले आहे.पुढे म्हटले आहे,त्या रेशन दुकानास बाबरवाडी, कोनाळ तिलारीवाडी, कट्टावाडी, वायंगणतड आदी वाड्या जोडलेल्या आहेत. रेशनधान्य दुकान दोडामार्ग बेळगांव रस्त्याजवळ असल्याने सर्व लोकांना सोईस्कर आहे. त्यामुळे धान्य दुकान स्थलातरीत करु नये असेही म्हटले आहे.
