दोडामार्गमध्ये संजय गांधी योजना शाखा सुरु करा

अन्यथा बेमुदत उपोषण;
साबाजी सावंत यांचा इशारा

⚡दोडामार्ग,ता.०६-: येथील तहसीलमध्ये संजय गांधी निराधार योजना शाखा तत्काळ सुरु करा; अन्यथा बेमुदत उपोषण करू असा इशारा दिव्यांग संघटना अध्यक्ष साबाजी सावंत यांनी दिला.
प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे,
दोडामार्ग तालुक्याची निर्मिती होऊन बरीच वर्षे झाली. सर्व शासकीय कार्यालये दोडामार्ग मध्ये सुरु झाली;परंतु तहसील मध्ये अद्यापपर्यंत संजय गांधी निराधार योजना शाखा मंजूर नाही.शिवाय तहसील कार्यालयातील कर्मचारी वर्गही अपुरा आहे.संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचे अंदाजे बावीसशे लाभार्थी आहेत. त्यातच संजय गांधी योजनेच्या टेबलावर काम करणारे कारकून अन्यत्र बदलीने गेल्याने व त्यांच्या जागी अद्याप पर्यंत दुसरा कारकून न दिल्याने दिव्यांग व निराधार यांची कामे होण्यास विलंब होणार आहे.

दिव्यांग व निराधारांच्या पेन्शनचे काय?

दिव्यांग व निराधार यांना देण्यात येणारी प्रतिमहिना एक हजार रुपये पेन्शन अनुदान नसल्याने चार महिने उलटून गेले तरी अद्याप न मिळाल्याने ज्यांना आधार नाही व याच पेन्शन वर अवलंबून असणाऱ्या निराधारावर उपासमारीची वेळ आली आहे.

शासनाने सगळ्या गोष्टींचा विचार करून येत्या पंधरा दिवसात संजय गांधी निराधार योजनेच्या टेबलवर कायमस्वरूपी कारकून द्यावा, संजय गांधी योजनेची शाखा तत्काळ सुरु करावी,तसेच वेळोवेळी अनुदानही द्यावे ;अन्यथा दोडामार्ग दिव्यांग, निराधार संघटना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसेल असा इशारा श्री.सावंत यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page