⚡मालवण ता.०५-: उमेद, ग्रामपंचायत कोळंब व समर्थ हॉल कोळंब यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश चतुर्थीसाठी लागणारे सर्व वस्तुंचे भव्य प्रदर्शन व विक्री अर्थात ‘संस्कृती कोकणची, आमच्या मालवणची’ हा मालवण तालुका मर्यादित उपक्रम दि. ९ ते १७ सप्टेंबर या कालावधीत समर्थ हॉल कोळंब मालवण याठिकाणी आयोजित आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या अनेक उत्पादकांना बाजारपेठ मिळवून देणे तसेच त्यांना विक्रीचा अनुभव येण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. ग्रामीण भागातील माहिला समुहांनी तयार केलेल्या अनेक वस्तु एकाच छताखाली पाहायला मिळणार आहेत.
आपल्या गावातील महिला बचतगटांना आर्थिक सक्षम करण्यासाठी आणि मार्केटमध्ये त्यांनी बनविलेल्या पदार्थांना एक स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने कोळंब गावातील उमेद महिला बचतगटांच्या महिलांनी एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कोळंब ग्रामपंचायत आणि समर्थ हॉल या व्यवस्थापनानेही त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला बचतगटातील महिलांनी बनविलेल्या वस्तू प्रदर्शनात मांडून त्यांना आर्थिक फायदा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या अभिनय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी संस्कृती कोकणची, आमच्या मालवणची’ हि टॅग लाईन घेण्यात आलेली आहे.
कोकणात गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात घराघरात साजरा करण्यात येत असतो. या उत्सवात मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील अनेक बंद घरेही उघडली जात असतात. मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावात दाखल होत असतात. आता कोकण रेल्वेमुळे अगोदर चार दिवस येणारे चाकरमानी गणेशोत्सवाच्या अगोदर एक दिवस दाखल होतात. यामुळे त्यांनी गणपती या उत्सवासाठी आवश्यक असणारे साहित्य आणि इतरही सर्व गोष्टी उपलब्ध करण्यासाठी शहरात धाव घ्यावी लागत आहेत. याच गोष्टीकडे लक्ष ठेवून उमेद या महीला बचत गटाच्या प्रतिनिधीनी चाकरमान्याची होणारी धावपळ थांबवून त्यांना एकाच ठिकाणी सर्व आवश्यक उत्सवासाठी साहित्य मिळावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. यात तालुक्यातील मोठ्या संख्येने महिला बचतगट सहभागी होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी ज्या महिला समुहांना आपल्या उत्पादनासाठी स्टॉल मांडायचे असतील त्यांनी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी कोळंब सरपंच सिया धुरी (7506453362), दिपलक्ष्मी थर (9404170505) दर्शना चव्हाण (9405909567) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
