⚡मालवण ता.३१-: विद्यार्थ्यांच्या पुढील करियरच्या दृष्टीने जेईई आणि नीट या दोन्ही परीक्षा अत्यंत आवश्यक आहेत. या परीक्षांसाठी आठवड्याचे वेळापत्रक निश्चित करणे आवश्यक आहे. या कालावधीत शारीरिक, मानसिक तसेच भावनिकदृष्ट्या सक्षम असणेही महत्वाचे असून मानसिक ताण न घेता सहजपणे या परीक्षांना सामोरे जावे, असे प्रतिपादन मुंबई येथील डॉ. महेश अभ्यंकर यांनी येथे बोलताना केले.
मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणच्या दादा शिखरे सभागृहात जेईई आणि नीट याबाबत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शक म्हणून मुंबई येथील डॉ. महेश अभ्यंकर हे बोलत होते. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे यांनी डॉ. अभ्यंकर यांचे स्वागत करून संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. तर संजय वराडकर यांनी अभ्यंकर यांचा परिचय करून दिला. कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे संस्थापक सदस्य अशोक अवसरे यांच्या हस्ते डॉ. अभ्यंकर यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. भोगटे यांनी काढलेले त्यांचे स्केच भेट म्हणून देण्यात आले.
यावेळी डॉ. अभ्यंकर यांनी मार्गदर्शन करताना जेईई आणि नीट या दोन्ही परीक्षांचा अभ्यास कसा करावा, त्याचे योग्य नियोजन तसेच कॉलेज आणि क्लास यामध्ये शिकविले जाणारे अभासक्रम याविषयी माहिती देत नियमितपणे अभ्यास करणे खूप महत्वाचे असल्याचे सांगितले. यासाठी किती वेळ अभ्यास करणे आवश्यक आहे, याची माहिती देत अभ्यास करून शेवटच्या दिवसांत जास्तीत जास्त पेपर सोडवून परीक्षेची तयारी करावी, असे सांगितले. तसेच शिक्षक आणि पालक यांचा योग्य उपयोग करून घ्यावा. या काळात योग्य आहार, विहार, मेडिटेशन त्याचप्रमाणे योगा यांचा वापर करावा. मानसिक ताण घेऊ नये. पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना कुठलीही सक्ती करू नये. हसत-खेळत मुलांना समजून घेऊन त्यांना साथ दिल्यास मुले नक्कीच यशस्वी होऊ शकतात, असे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसनही डॉ. अभ्यंकर यांनी केले.
यावेळी ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी, पालक तसेच सेवांगण कार्यकारिणीचे प्रकाश कुशे, शैलेश खांडाळेकर, व्यवस्थापक संजय आचरेकर, समुपदेशक मनोज गिरकर, वैष्णवी आचरेकर आदी उपस्थित होते. आभार मनोज गिरकर यांनी मानले.
