सिंधूदुर्गनगरी ता २ कोरोना यौद्धा अशी शासनाने बिरुदावली दिलेल्या जिल्हा रुग्णालयातील रेंवीय निदान प्रयोग शाळेतील १३ कर्मचाऱ्यांना गेल्या ४ महिन्यापासून मानधनच मिळालेले नाही. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांनी मंगळवार पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मानधन जमा होत नाही तोपर्यंत कामावर रुजू होणार नसल्याचा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. मानधन न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत डॉक्टर व जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची भूमिका फार महत्वाची राहिली आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना सेवा देण्याचे काम या कर्मचाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे शासनाने त्यांना कोरोना योद्धा असे संबोधले. मात्र या कठीण काळात सेवा देणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळा मधील शिपाई व परिचर यांना मानधन मिळालेले नाही. तब्बल चार महीने मानधन मिळालेले नाही. नाशिक येथील एका ठेकेदारांने या कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर ते जानेवारी पर्यंत चे मानधन त्यांच्या खात्यात जमा केलेले नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी देखील याकडे लक्ष देत नाहीय. या अन्याया विरोधात स्वप्नील बिरमोळे, पंकज परब, रेखा घंटा, नामदेव मेस्त्री, सचिन परब, गौरेश मर्टल, विठ्ठल सावंत,एकनाथ मर्टल, अजय खरात, सदाशिव परब, प्रसाद मर्टल, वैभव हुंबरमळेकर यांनी प्रयोगशाळा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना २४ फेब्रुवारी रोजी निवेदन देऊन तसा इशारा दिला होता. मात्र त्या मागणीची पूर्तता न झाल्याने या कर्मचाऱ्यांनी आजपासून मानधन जमा होइपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन केले आहे. शासन याकडे लक्ष देईल का ? चार महिन्याचे मानधन मिळालेले नसल्याने कोरोना चाचणी केंद्रातील १३ कर्मचारी आर्थिक अडचणीत आहेत. कोरोना सारख्या महाभयंकर व्हायरसशी दोन हात करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे ठेकेदार कंपनीने मानधन थकविले आहे. याकडे शासन व जिल्ह्यातील राजकर्ते लक्ष देतील का ? असा प्रश्न या कर्मचाऱ्यांमधून विचारला जात आहे.
मानधन न मिळाल्याने जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
