एसटी प्रशासनाने डोळेझाक केल्याने पुन्हा घडली दुर्घटना
*💫मालवण दि०२-:* चाळीस वर्षांपूर्वी बांधलेल्या मालवण बस स्थानकाची इमारत जीर्ण झाली असून गेल्या वर्षी पासून या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळून एक वृद्ध प्रवासी जखमी झाला होता. जीर्ण आणि धोकादायक बनलेल्या या इमारतीबाबत एसटी प्रशासनाने डोळेझाक केल्याने आज पुन्हा या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, दोन वर्षापूर्वी नवीन बसस्थानकाचे भूमिपूजन पार पडल्यानंतरही निधी अभावी हे काम रखडले गेले आहे. परिणामी प्रवासी व कर्मचारी यांना जीव मुठीत घेऊन धोकादायक इमारतीखाली राहण्याची वेळ आली आहे. या संबंधीचे अधिक वृत्त असे की, ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली मालवण बसस्थानकाची इमारत जीर्ण आणि धोकादायक बनली आहे. गेल्यावर्षी तर या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला होता. या दुर्घटनेत एक वृद्ध जखमीही झाला होता. हे घडूनही एसटी प्रशासन शहाणे बनले नाही. ज्याठिकाणी इमारत धोकादायक बनली आहे, त्याठिकाणी दुरुस्ती करणे गरजेचे होते. मात्र एसटी प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आज स्लॅबचा काही भाग कोसळण्याची पुनरावृत्ती घडली.
