आनंद हुले यांचा इशारा
⚡मालवण ता.२५-: मालवण बंदरातील नवीन जेटीचे अपूर्ण काम, वेंगुर्ला येथे नवीन बहुउद्देशीय पाईल जेटी उभारणे, रो – रो क्रुझ सेवा, मुंबई – दिघी रो पँक्स कोकण बोट सेवा अशा कोकणातील विविध बंदर विकास व जल वाहतुकीवर महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून दप्तर दिरंगाई व हलगर्जीपणा होत आहे. त्यामुळे याच्या निषेधार्थ मेरिटाईम बोर्डाच्या सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात १५ ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा कोकण बंदर विकास समितीचे आनंद हुले यांनी महाराष्ट्रात मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
मालवण बंदर विकसीत करण्यासाठी सागरमाला योजनेच्या धोरणानुसार अंमलबजावणीसाठी आपण पंतप्रधान कार्यालयाला पत्रव्यवहार केला होता. त्याची दखल घेत केंद्रीय नौकानयन खात्यामार्फत व महाराष्ट्र शासनाने सागरमालातून १० कोटी मंजूर केलेले होते. या निधीचा विनीयोग मालवण बंदर विकसीत करताना जेटी बांधणे व सुसज्ज रो रो क्रुझ टर्मीनल बांधणे असा प्रस्ताव होता. परंतु मेरीटाईम बोर्डाने वेळेवर काम पूर्ण केल्याने प्रकल्प खर्च वाढून १५ कोटी झाला. अद्यापही टर्मिनलचे काम पूर्णत्वास केलेली नाही. सध्या हे प्रवासी टर्मिनल अतिक्रमण बकालीच्या व विळख्यात अडकले आहे. मालवण बंदराला दरवर्षी सात लाख पर्यटक भेटी देतात, त्यांना मेरीटाईम बोर्ड कोणतीही सुविधा पुरवीत नाही. या जेटीचे काम पूर्णत्वास नेऊन सुसज्ज रो रो क्रुझ टर्मीनलचे उद्घाटन पावसाळ्यानंतर करावे, अशी मागणी आनंद हुले यांनी या निवेदनात केली आहे.
तसेच वेंगुर्ला बंदरावरील जेटी निष्काषीत करून तेथे नवीन पाईल जेटी बांधण्ण्याचा ८ कोटीचा प्रस्ताव महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने “चांदा ते बांदा” या योजनेन्वये पाठविला होता. कोकणातील ही अशा प्रकारची पहिली अत्याधुनिक जेटी असून त्यामुळे रो रो बोटसेवा, पर्यटकबोट वेंगुर्ला बंदरात थांबू शकेल. वेंगुर्ला बंदराच्या जवळ लॉजिस्टीक पार्क विकसीत करुन बेळगाव, हुबळी येथील माल Coastal Shipping द्वारा निम्म्या किंमतीत मुंबईत आणणे शक्य होणार आहे. परंतु एकही पैसा महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला दिलेली नव्हता. २०१७ साली महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे तत्कालीन सिंधुदुर्गचे प्रादेशीक अधीकारी कँ. अजीत टोपानो यांच्याकडून प्राप्त आश्वासक पत्रानुसार आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर योजलेले लाक्षणीक उपोषण स्थगित केले होते. परंतु मेरीटाईम बोर्डाने गेली पाच वर्ष आपली आश्वासन पाळले नाही. मत्स्य व मेरिटाईम बोर्डाने एकत्रित सुसज्ज अशी वेंगुर्ला बहुउद्देशीय जेटी विकसित करून ब्रेक वॉटरचे काम पूर्ण करावे, अशी मागणीही हुले यांनी केली आहे.
गणेशोत्सवाची कोकण रेल्वेची तिकिटे काही मिनिटात संपली. हजारो गणेशभक्त वाहतुकीचे साधन नसल्याने आपल्या गावी वेळेवरती जाऊ शकत नाही. एसटी व चिपी विमानतळाच्या सबसिडीपोटी महाराष्ट्र शासनाला प्रतिवर्षी सुमारे २५ कोटी तोटा होत आहे. आज कोकणवासीयांसमोर वाहतुकीचा कोणताही पर्याय नसल्याने गणेशभक्तांच्या सेवेसाठी यावर्षी महाराष्ट्र बोर्डाने मंजुरी दिलेले NAYAN-11 ही कँटामरीन बोट भाऊचा धक्का ते मालवण केलं प्रवास करू शकते तरी मेरीटाईम बोर्डाने कोकण बोट गणेशोत्सवाआधी सुरू होण्यासाठी युद्धपातळीवरती कार्यवाही करावी, असेही हुले यांनी म्हटले आहे.
त्याचप्रमाणे मुंबई -दिघी रो पँक्स कोकण बोटसेवा वेळेवर सुरू न होण्यास मेरीटाईम बोर्डाची दफ्तर दिरंगाई व हलगर्जी जबाबदार आहे.
कोकण बोटसेवेचा दुसरा टप्पा म्हणजे मुंबई- दिघी व्हाया काशीद रो पँक्स कोकणबोटसेवा डिसेंबर २०२२ ला सुरू होणार होता. मुंबई- दिघी अंतर सध्या ६-७ तास लागतात हेच अंतर आता रो पँक्स (Ro-PAX Boat) जलमार्गाने 20 Knotical Miles ( 30 Km/Hour) या वेगाने केवळ ३ तासात पार पडणार आहे. परंतु मेरीटाईम बोर्डाने जेटीचे काम पूर्ण नसल्याने हा प्रकल्प वेळेत होऊ शकत नाही व कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची मोठी गैरसोय होणार आहे. मुंबई – दिघी रो पँक्स कोकणबोटसेवा दिवाळी पूर्वी सुरू करावी, अशी मागणीही आनंद हुले यांनी केली आहे.
