पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटल मध्ये कोरोना लस देणार मोफत
*खासदार नारायण राणे स्वतः उचलणार लसीकरणाचा खर्च*
*💫ओरोस दि.०२-:* : कोरोना या महाभयंकर आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात विविध ठिकाणी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. शासकीय ठिकाणी हे लसीकरण मोफत करण्यात येणार आहे.तर खासगी रुग्णालयात २५० रुपये भरून हे लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री तथा खा. नारायण राणे यांचे पडवे येथील एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये अन्यत्र २५० रुपयांना मिळणारी कोरोनाची लस पूर्णपणे मोफत मिळणार आहे. या लसीकरणाचा सर्व खर्च खा. नारायण राणे स्वतः उचलणार आहेत. बुधवारी ३ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता या लसीकरणाचा शुभारंभ होणार आहे. हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने प्रसिध्दीपत्रकातून ही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये म्हटले आहे की, २०२१ मध्ये एक नवीन आशा घेऊन आले आहे. कोरोनावरील लस भारतात उपलब्ध झाली आहे. सिंधुदुर्गात कोरोना लसीकरण सुरू झाले असून एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटलला जिल्हयातील लसीकरण केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. या लसीकरण केंद्राचा शुभारंभ ३ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल येथे जिल्हाधिकारी सौ. के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिफे यांच्या उपस्थितीत होणार आहे. माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे हे या शुभारंभप्रसंगी खास उपस्थित राहणार आहेत. सदर लसीकरण हे अन्यत्र २५० रुपयांत होते. परंतु, एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल येथे हे लसीकरण पूर्णपणे मोफत होईल. त्याचा खर्च खासदार नारायण राणे उचलणार आहेत. या शुभारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. आर. एस. कुलकर्णी व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.अपुर्वा पडते यांनी केले आहे.
