सिंधूदुर्गनगरी दि.०२ अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी येथील विशेष न्यायालयाने गोकाक बेळगाव येथील मायप्पा लक्ष्मण हेगडे (23) याला दोषी ठरविले आहे. त्याला तीन वर्षे सश्रम कारावास आणि तिन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.सरकार पक्षाच्यावतीने सहायक सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले. रामदापूर गोकाक येथील मूळ वास्तव्य असलेला मात्र कामानिमित्ताने कणकवली तालुक्यात राहत असणारा मायप्पा याने आपल्या मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिला पळवून नेल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने पोलिसात दिली होती. १४ नोव्हेंबर २०१९ रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी तपासात पोलिसांनी दोघांनाही रामपूर येथील मायाप्पाच्या घरातून तब्बल १० दिवसा नंतर ताब्यात घेतले होते. २४ नोव्हेंबर २०१९ रोजी मायप्पा याला अटक करण्यात आली होती. न्यायलयाने त्याला २९ पर्यंत पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याला जामीन ही मंजूर झाला होता. या प्रकरणाच्या सिंधुदुर्गनगरी येथील विशेष न्यायालयात झालेल्या खटल्याच्या सुनावणीत एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित मुलीच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गायत्री पाटील यांनी केला. न्यायालयासमोर सादर झालेल्या साक्षी पुराव्याच्या आधारे फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी भादवि कलम 363 अन्वये त्याला दोषी धरण्यात आले.
*अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी आरोपीस तीन वर्षाचा कारावास
