जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी केली निवड : वैभववाडी तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव
⚡वैभववाडी ता.२३-: महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अंतर्गत सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिंची जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून निवड करण्यात येते. वैभववाडी तालुक्यातून संदेश तुळसणकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी निवड केली आहे.
ग्राहक पंचायत प्रवासी महासंघ कोकण विभाग माजी सहसंघटक तथा उपाध्यक्ष तसेच जि.प.चे माजी वित्त व बांधकाम सभापती व वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे विद्यमान कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अर्जुन रावराणे विद्यालयात काम करत असल्यामुळे माझी निवड झाली असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे देखील जिल्ह्यातील विद्यार्थी , पालक यांच्या समस्या , वीज वितरण, टेलिफोन, एस. टी.महामंडळ,वैद्यकीय सेवा तसेच जिल्ह्यातील पुरवठा विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी सांगितले.
संदेश तुळसणकर हे वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे गावचे रहिवाशी असून विविध पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत त्याच बरोबर त्यांचे सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील कार्य खूप मोठे आहे. राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार प्राप्त शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा सचिव,कुंभार समाज वैभववाडी तालुका अध्यक्ष,एस आर दळवी फाउंडेशन वैभववाडी तालुका अध्यक्ष अशा विविध पदावर काम करत असल्यामुळे अनुभव प्राप्त व्यक्तिमत्व आहे त्यांच्या निवडीबद्दल वैभववाडी तालुक्यातील मित्रपरिवार व हितचिंतकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.