सर्वसामान्य नागरिक त्रस्त : वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; महिला वर्गातून नाराजी..
⚡बांदा ता.२३-:
पंचक्रोशीतील मडुरा, पाडलोस, रोणापाल, कास यासह अनेक गावांत गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू आहेत. विज बिले अवाच्यासव्वा आकारली जातात मात्र त्या बदल्यात अखंडित वीज पुरवठा केला जात नाही. ग्रामीण भागातील विजेच्या महत्त्वाच्या समस्येकडे वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वीज ग्राहकातून होत आहे. तसेच वीज पुरवठा अखंडित न केल्यास कामचुकार अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा पाडलोस गावातील ग्रामस्थांनी दिला आहे.
जून व जुलै महिन्यात सातत्याने होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे तसेच कमी उच्च दाबाचा होणाऱ्या पुरवठामुळे अनेक विद्युत उपकरणे खराब झाल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे याचा नाहक आर्थिक भुर्दंड ग्रामस्थांना सहन करावा लागतो. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना अभ्यास करताना दिवा किंवा मेणबत्तीचा आधार घ्यावा लागतो. सरकारने एकीकडे रॉकेलचा पुरवठा बंद केला अन दुसरीकडे वीज वितरणने आपली बत्ती गुल केली. त्यामुळे सद्यस्थितीत शाळकरी मुलांना शिक्षण घेताना समोर काळोख दिसत आहे.
चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मडुरा, पाडलोस भागात अनेक ठिकाणी मोठी झाडे विद्युत वाहिन्यांवर कोसळली. यात विद्युत वाहिन्यासह विद्युत खांबचे नुकसान झाले. शेतात काम करून थकून आलेल्या शेतकरी महिला वर्गाला वीज नसल्यामुळे मुख्य समस्येस सामोरे जावे लागते. याकडे वीज खात्याने जबाबदारीने लक्ष देऊन वीज पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.
तर रॉकेलचा पुरवठा करा
मडुरा पंचक्रोशीत ज्यावेळी वीज गुल होईल त्यावेळी वीज वितरणने पुढाकार घेऊन रॉकेलचा मोफत पुरवठा वीज ग्राहकांना करावा. अन्यथा वीज पुरवठा अखंडित सुरू ठेवावा अशी मागणी होत आहे.