….तर उपोषणाशिवाय पर्याय नाही

दूरध्वनी सेवेसाठी झोळंबेच्या आजी-माजी सरपंचांचा बीएसएनएल ला इशारा

⚡बांदा ता.२३-: झोळंबे गावात मागील काही महिन्यांपासुन मोबाईल रेंजच नसल्याने सेवा विस्कळीत झाली आहे. पावसाळ्यात आपत्कालीन स्थितीत संपर्क साधने अवघड होत असल्याने गावातील सेवा सुरळीत करावी या मागणीचे निवेदन दुरसंचारच्या अधिकाऱ्यांना झोळंबे ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आले.

नेटवर्क नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. सद्यस्थितीत बीएसएनएल वगळता कोणत्याही नेटवर्कच्या माध्यमातुन गावात सेवा नाही. मात्र बीएसएनएलची सेवा देखील विस्कळीत झाली आहे. या होणार्‍या गैरसोई बाबत सावंतवाडी येथे बीएसएनएल अधिकार्‍यांना जाब विचारण्यात आला. यावेळी झोळंबेचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सतीश कामत यांच्या समवेत सरपंच विशाखा नाईक, उपसरपंच विनायक गाडगीळ यांनी अधिकार्‍यांनी सावंतवाडी येथे भेट घेतली.
बीएसएनएलचे डेप्युटी जनरल मॅनेजर श्री. जानु आणि मोबाईल डिपार्टमेंट प्रमुख श्री. देशमुख यांची यावेळी भेट घेण्यात आली. यावेळी गावात रेंज नसल्याने होणार्‍या समस्यांचा पाढाच यावेळी अधिकार्‍यांसमोर वाचण्यात आला. यावेळी दोन प्रमुख मागण्या लेखी स्वरुपात करण्यात आल्या. फुकेरी टाॅवर पूर्ण क्षमतेने त्वरीत कार्यान्वित करणे. त्यासाठी आवश्यक साधनसुविधा लगेच पुरविण्यात याव्यात तसेच झोळंबे येथील प्रस्तावित मोबाईल टाॅवर तात्काळ उभारण्यात यावा. या मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर न झाल्यास स्वातंत्रदिनी १५ ऑगस्ट रोजी उपोषण छेडण्याचा इशाराही यावेळी लेखी स्वरुपात देण्यात आला आहे.

You cannot copy content of this page