१७६० मिमी पावसाची नोंद
वेंगुर्ला प्रतिनिधी- गेले काही दिवस पडणा-या संततधार पावसाने राहत्या घरांवर तसेच मांगरांवर झाडे पडल्याने नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. २२ जुलैपर्यंत ३ लाख ९४ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले आहे. शनिवारी ७२ मि.मी.पाऊस पडला असून एकूण १७६० मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील आसोली येथील शंकर सोमा नाईक यांच्या मांगरावर झाड पडून १४ हजार ५००चे नुकसान, जोसोली येथील सद्गुरु श्रीधर गावडे यांच्या घरावर झाड पडून १९ हजार रुपयांचे नुकसान, तुळस येथील चंद्रकांत आत्माराम सावंत यांच्या घरावर झाड पडून ६ हजार ४०० रुपयांचे नुकसान, वजराठ-वरचीआड येथील गणपत धोंडू सावंत यांच्या घरावर झाड पडून ८ हजार ५०० रुपयांचे नुकसान, तुळस-पलतड ते तुळस मातोंड पर्यंत असलेल्या पंतप्रधान ग्रामसडक रस्त्याच्या साईडपट्टीची माती पुराच्या पाण्याने वाहून जाऊन खड्डा पडला. तुळस येथील अपूर्वा नारायण दामले यांच्या घराची भित व वासे मोडून ४७ हजार ५०० रुपयांचे नुकसान, वायंगणी येथील बाळकृष्ण रेवणकर यांच्या घराचे छप्पर पडून ५२ हजारांचे नुकसान, तुळस-खराटवाडी येथील वसंत शांताराम घारे यांच्या मांगराची पडवी पडून वासे, रिप, कौलाचे धरुन एकूण २९ हजार ५०० रुपयांचे नुकसान, मठ येथील संतोष साबाजी धुरी यांचा शेतमांगर पडून ३६ हजार ५०० रुपयांचे नुकसान, मठ येथील संतोश विश्वंभर मठकर यांच्या घराची मातीची भित कोसळून २९ हजार ५०० रुपयांचे नुकसान, वेंगुर्ला शहरातील अशोक यशवंत वेंगुर्लेकर यांच्या घरानजिकचा संरक्षित कठडा पडला आहे. वेंगुर्ला येथील चंद्रकांत भिकाजी रायकर यांचे मातीचे धर पडून १ लाख ६ हजार ५०० रुपयांचे नुकसान, वेतोरे-पालकरवाडी येथील विजय बाबाजी पालकर यांच्या पक्के घर अंशतः पडून अंदाजे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले.
दरम्यान, काही क्षण विश्रांती घेणारा पाऊस पुन्हा वादळी वा-यासह येत असल्याने नदी, ओहोळ हे दुथडी भरुन वाहत आहेत. तर विजेचा खेळखंडोबाही होत आहे.
