दोडामार्गात पावसाची जोरदार बॅटिंग…

तिसरा दिवस: नदी नाले, धरणे तुडुंब,तिलारी वीजघर मार्गावर पाणी

⚡दोडामार्ग,ता.२१-: तालुक्यात तिसऱ्या दिवशीही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.कधी थोडी विश्रांती घेवून तर कधी संततधार पाऊस कोसळत आहे.नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत.तालुक्यातील तिलारी धरण आणि तेरवण मेढे उन्नेयी बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे.तिलारी धरणात १०५ मीटर पाणीसाठा आहे तर उन्नेयी बंधाऱ्यात पाणी क्षमतेपेक्षा अधिक झाल्याने बंधाऱ्याचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत.
मुसळधार पावसामुळे काल रात्री कोनाळ ते घोटगेवाडी मार्गावरील कमी उंचीचा पूल पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थांनी भटवाडी येथे बांधलेल्या नव्या पुलावरुन प्रवास केला.एरवी दोन्ही पूल पाण्याखाली असायचे आता लोकांसमोर नव्या पुलाचा पर्याय आहे.अंतर अधिक पडत असले तरी सुरक्षितपणे घोटगेवाडी, केर,मोर्ले, भेकुर्ली आदी गावांना बिनघोर जाणे शक्य झाले आहे.
दोडामार्ग वीजघर कोल्हापूर मार्गावर घाटीवडे येथे रात्री रस्त्यात पाणी साचल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. साटेली भेडशी येथे नवीन पूल झाले असले तरी जोडस्त्याच्या उंचीचे काम शिल्लक असल्याने तो रस्ता पाण्याखाली गेला होता; मात्र त्या पुलाला मूळ रस्ता आणि त्यावरील पर्यायी पूल असल्याने वाहनचालक आणि प्रवाशांची गैरसोय झाली नाही.नव्या पुलावरचा मार्ग बंद असल्याची माहिती स्थानिकांनी रस्त्यात झाडे टाकून ,पिंपे उभी करून वाहनचालकांना माहिती दिली.
मुसळधार पावसामुळे कोनाळकट्टा,घोटगेवाडी परिसरात पाणी आले होते.आपत्ती नियंत्रण विभाग आणि तिलारी पाटबंधारे विभाग पाणी घरात घुसून नुकसान होऊ नये यासाठी सतर्क आहे.पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास काठावरील ग्रामस्थांना अन्यत्र हलविण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे.

You cannot copy content of this page