रियाज खान: तहसीलदारांकडे निवेदनद्वारे केली मागणी
⚡बांदा ता.१९-: तेरेखोल नदीच्या काठावर वसलेले बांदा शहर व परिसरातील इन्सुली, शेर्ले, वाफोली या गावात पुराचे पाणी शिरून दरवर्षी कोट्यावधी रुपयांची हानी होत असते. प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापन केवळ कागदावरच असून बांदा शहरासाठी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शिवसेनेचे सावंतवाडी तालुका अल्पसंख्यांक उपाध्यक्ष रियाज खान यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तहसीलदार पाटील यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवून लवकरात लवकर साहित्य देण्याचे आश्वासन यावेळी दिले.
श्री खान यांनी निवेदनात म्हटले आहे की, बांदा शहर व परिसरातील शेर्ले, इन्सुली, वाफोली, आरोसबाग ही गावे तेरेखोल नदीच्या पूर प्रवण क्षेत्रात येतात. तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी या गावातील लोकवस्तीत घुसत असल्याने दरवर्षी कोट्यवधी रुपयांची वित्तहानी होते. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने हा परिसर ब्लू झोन म्हणून जाहीर केलेला आहे. मात्र प्रशासनाकडून आपत्कालीन स्थितीत कोणतेही साहित्य अद्याप पर्यंत देण्यात आलेले नाही.
मंगळवारी रात्री उशिरा बांदा आळवाडी परिसरात तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी शिरले, मात्र व्यापाऱ्यांना सामान सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी कोणतेही साहित्य उपलब्ध नसल्याने स्थानिकांना त्रास सहन करावा लागला.
बांदा शहरातील पूरबाधित लोकसंख्या ही 1700 आहे तर पूरबाधित कुटुंबे हि 830 आहेत. इन्सुलीतील पूरबाधित कुटुंबे ही 430 असून बाधित लोकसंख्या एकूण 1800 आहे. शेर्लेतील बाधित कुटुंबे ही 36 असून लोकसंख्या 106 आहे. बांदा परिसरातील पूरबाधित लोकसंख्या ही हजारोंच्या घरात असून प्रशासनाने दिलेले आपत्ती व्यवस्थापनचे साहित्य हे तोकडे आहे.
बांदा शहर हे केंद्रबिंदू असून प्रशासनाने आणीबाणीच्या काळात संपर्क यंत्रणा बंद होत असल्याने या ठिकाणी सॅटॅलाइट फोन देणे आवश्यक आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी यांत्रिक नौका, लाईफ जॅकेट, मजबूत दोरीचे बंडल, रबरी ट्यूब, फायबर बोट, बॅटऱ्या, अत्यावश्यक रुग्णांसाठी स्ट्रेचर, प्राशिक्षित गोताखोर टीम, अत्याधुनिक दुर्बीण, ड्रोन कॅमेरा आदी साहित्य तात्काळ मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी रियाज खान, सागर धोत्रे, श्रीकांत धोत्रे, व्यंकटेश ऊरुमकर, राजा खान, भरत धोत्रे आदी उपस्थित होते.
