शंकर आचरेकर:मालवण येथील मार्गदर्शन व्याख्यान संपन्न..
⚡मालवण ता.१९-; कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते त्यामुळे कोणतेही काम करण्यास लाजू नये. विद्यार्थ्यांनी पुढील वाटचालीत आपल्यातील कौशल्य ओळखून त्यावर मेहनत घेत आवडीचे करियर निवडावे. आजच्या काळात नोकरी करण्याऐवजी उद्योजक बनण्याचे प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावेत, असे प्रतिपादन मालवण मधील उद्योजक आणि भंडारी हायस्कूल मालवणचे माजी विध्यार्थी शंकर आचरेकर यांनी भंडारी ए. सो. हायस्कुल मालवण येथे बोलताना केले.
मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल मध्ये जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि परदेशात नोकरी केल्यावर आता मालवणात पर्यटन उद्योग व्यवसाय करणारे दांडी मालवण येथील शंकर आचरेकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी मुख्याध्यापक हणमंत तिवले यांच्या हस्ते शंकर आचरेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेचे आयबीटी विभागाचे निदेशक केशव भोगले, जगन्नाथ आंगणे, नेहा गवंडे, दर्शना मयेकर आदी उपस्थित होते.
यावेळी शंकर आचरेकर म्हणाले, आपण वेल्डिंग सारख्या क्षेत्राचे शिक्षण घेऊन दुबई व कतार या देशातील कंपनी मधून उच्च पदावरून निवृत्त झालो. वेल्डिंगचे शिक्षण घेतले तरी आपण त्यात प्रगती करत, माझे कौशल्य विकसित करत, व्यवस्थापनातील बारकावे शिकत नोकरीतील उच्च पदापर्यंत पोहचलो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्यातील कौशल्य ओळखून त्यावर मन लावून काम करत आवडीच्या क्षेत्रात करियर करावे. नोकरी करणे जरी आवश्यक असले तरी आजच्या काळात विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन उद्योजक बनावे. आज मी मालवणच्या पर्यटन क्षेत्रात उद्योग व्यवसाय करत असून विद्यार्थ्यांनीही मालवणातील वाढते पर्यटन लक्षात घेऊन उद्योग व्यवसाय करावा, असेही आचरेकर म्हणाले.
प्रास्ताविक केशव भोगले यांनी केले. केशव भोगले व नेहा गवंडे यांनी युवा कौशल्य व आयबीटी विभागाची माहिती दिली. सूत्रसंचालन जगन्नाथ आंगणे यांनी केले. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
