पशु संवर्धन व दुग्ध विकास विभाग वैयक्तिक लाभाचा निधी मार्च अखेर पूर्वी खर्च करा

पहिल्या यादीस मंजूरी तर दुसरीही लवकरच तालुकास्तरावर पाठवणार : पशु संवर्धन व दुग्ध विकास समिती सभापती राजेंद्र म्हापसेकर

सिंधूदुर्गनगरी ता १ पशु संवर्धन व दुग्ध विकास विभागाकडील वैयक्तिक लाभाच्या पहिल्या यादया मंजूर होवून तालूका पंचायत समिती स्तरावर पाठविण्यात आल्या आहेत. दूसरी यादी लवकरच पाठविली जाईल. तालूका स्तरावर काम करणाऱ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मार्च अखेर पूर्वी निधी खर्च करायचा आहे. त्यामुळे तशाप्रकारे नियोजन करून जलद काम करावे, अशा सूचना जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा पशु संवर्धन व दुग्ध विकास समिती सभापती राजेंद्र म्हापसेकर यानी सोमवारी मासिक सभेत दिल्या. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात श्री म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा सकाळी संपन्न झाली. यावेळी सभा सचिव तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ दिलीप शिंपी, सदस्य अनुप्रिती खोचरे, मानसी धुरी, प्रभारी जिल्हा कृषि अधिकारी संजय गोसावी यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना सभापती म्हापसेकर यानी दुधाळ जनावरे वाटप योजनेचे १२५ प्रस्ताव मंजूर करून तालूका स्तरावर पाठविलेले आहेत. दूसरी यादी आठ दिवसांत पाठविली जाईल. तसेच नव्याने १७ लाख रूपयांची मंजूर करण्यात आलेल्या परसबाग व तलंग वाटप या खास महिलांसाठीच्या योजनेची यादी लवकरच मंजूर करण्यात येणार आहे. यासाठी महिला व बाल कल्याण विभागाकडून कुपोषित मुलांची यादी मागविण्यात आली आहे. त्यानंतर लवकरच २५ पिल्लांची ही योजना राबविली जाईल. अँस्केड योजने अंतर्गत जिल्ह्यात पशु विषयी प्रशिक्षणे घेण्यासाठी २५ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. परंतु कोरोनामुळे ही प्रशिक्षणे घेता येणार नाहीत. त्यामुळे पशु विषयी माहिती देणारी पत्रके छापण्यासाठी व फलक लावण्यासाठी यावेळी मंजूरी देण्यात आली. यावेळी सभापती म्हापसेकर यानी याबाबत आर्थिक अनियमितता होणार नाही. चांगल्या दर्जाचे काम होईल, याकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या. साटेली-भेडशी, दाणोली व वैभववाडी या तीन दवाखाण्याची दुरुस्ती यावर्षी न झाल्यास दवाखाने चालवु शकत नाही. त्यामुळे या तिन्ही इमारतींच्या दुरुस्तीची अंदाजपत्रके तयार करण्याचे आदेश बांधकाम विभागाला देण्यात आले. त्यासाठी जिल्हा नियोजनकडे निधी मागण्याचा निर्णय घेण्यात आला.

You cannot copy content of this page