मालवणात लवकरच शिवसेना शिंदे गटाचा मेळावा

मेळाव्यात मोठे राजकीय फटाके फोडणार; राजा गांवकर यांचा इशारा

⚡मालवण ता.१७-: मालवणात लवकरच शिवसेना शिंदे गटाचा मोठा मेळावा घेतला जाणार आहे. या मेळाव्यात मालवणातील मोठे पक्षप्रवेश अर्थात मोठे फटाके फुटतील. त्यावेळी कोण कोणा सोबत आहे हे कळेल, असे शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख राजा गांवकर यांनी पत्रकार परिषदेत सांगत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना सूचक इशारा दिला आहे.

मालवण येथील हॉटेल रामेश्वर येथे शिवसेना शिंदे गटाची पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाप्रमुख राजा गावकर, उपतालुकाप्रमुख पराग खोत, महिला उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, उपतालुकाप्रमुख भारती घारकर, गीता नाटेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी राजा गावकर म्हणाले, राज्यात ठाकरे सरकार आले आणि चांदा ते बांदा योजना बंद पडली. ही योजना आता सिंधुरत्न म्हणून रूपांतरित झाली असून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून ही योजना राबविली जात आहे. मात्र याबाबत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक व पदाधिकारी सिंधुरत्न मधून उपलब्ध झालेला निधी आपणच आणल्याचे सांगून अकलेचे तारे तोडत आहेत. आम. नाईक यांनी फुकाचे श्रेय घेऊ नये, तसेच जनतेत अफ़वा पसरवू नये. आमदार नाईक व ठाकरे गट पदाधिकाऱ्यांनी आधी आपल्या घरात किती अंधार आहे हे पहावे, असेही राजा गावकर म्हणाले.

शिवसेना शिंदे गटाचा मालवणात लवकरच मेळावा घेण्यात येणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निमंत्रित केले जाणार आहे. येत्या नगरपालिका निवडणुकी पूर्वी हा मेळावा घेण्यात येईल. या मेळाव्यात मोठे राजकीय फटाके आम्ही फोडणार आहोत, असेही राजा गावकर म्हणाले.

आम नाईक यांनी आता फसविण्याचे धंदे बंद करावेत —- शिंदे

यावेळी शिवसेनेचे कुडाळ-मालवण विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे यांनी राज्यातील शिंदे सरकारकडून मंजूर झालेल्या मालवण तालुक्यातील विकासकामांची भूमिपूजन करण्याचे काम स्थानिक आमदार वैभव नाईक करत आहेत. खोटे बोलण्यात माहीर असलेल्या आमदारांनी आपण निधी आणला असे सांगून जनतेला फसविण्याचे धंदे बंद करावेत, पूर्वीच्या सरकारमधील चांदा ते बांदा आणि आताच्या सरकारमधील सिंधू-रत्न योजना ही विद्यमान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीच सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून मच्छीमारांसह अन्य घटकांना लाभ मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे या योजनेचे संपूर्ण श्रेय हे केसरकर यांनाच जाते. याउलट चांदा ते बांदा योजना बंद करण्याचे पाप मागील ठाकरे सरकारच्या काळात झाले. त्यामुळे आमच्या नेत्यांनी ही योजना सुरू केले हे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगणे चुकीचे आहे. आमदार नाईकांचे मतदार संघात गेल्या काही वर्षातील कार्य जनतेला माहीत आहे. त्यांच्याकडून केवळ जनतेची फसवणूक करण्याचे एककलमी काम सुरू आहे. त्यामुळेच ते तालुक्यातील विविध विकासकामांसाठी जो निधी मंजूर आला आहे. तो आपणच आणला असे सांगून त्याची भूमिपूजन करण्याचा सपाटा लावत आहेत. मात्र या कामांना निधी कोणी दिला हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे त्यांनी जनतेची दिशाभूल करणे थांबवावे आणि फुकाचे श्रेय घेऊ नये. असे शिंदे म्हणाले.

You cannot copy content of this page