सरकार तुमचे मग उपजिल्हा रुग्णालयात खाजगी कर्मचारी कशासाठी?

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा सवाल;जनतेची फसवणूक आता तरी थाबवा

⚡कणकवली ता.११-: कणकवली उपजिल्हा रुग्णालयात
तात्पुरत्या खाजगी पद्धतीने १२ कर्मचारी देऊन आम.नितेश राणे यांनी.जनतेची फसवणूक सुरू केली आहे. केंद्र आणि राज्यात आम.नितेश राणे सत्तेत असताना देखील या रुग्णालयात यंत्रसामग्री आणि डॉक्टरांची रिक्त पदे शासन का भरत नाही ? तुम्ही 9 वर्षे आमदार असताना हा प्रश्न सोडवू शकला नाही हे तुमचे अपयश आहे असा टोला युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लगावला आहे. तसेच यापुढील काळात युवा सेना सरकारला जाग आणण्यासाठी कणकवली विधानसभेतील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये धडक देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषद युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक बोलत होते. यावेळी विधानसभा संघटक राजू राठोड,युवासेना तालुकाध्यक्ष सचिन आचरेकर,तालुका संघटक नितेश भोगले,विभागप्रमुख सिद्धेश राणे आदी युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
सुशांत नाईक म्हणाले,कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गेलो होतो,त्यावेळी रुग्णालयात अनेक समस्या आहेत,त्याचे कथन डॉ.धर्माधिकारी यांनी केले होते. आम्ही रुग्णालयात गेल्यावर आमदार नितेश राणे यांना जाग आली.कणकवली उपजिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक यंत्रसामुग्री, त्याचबरोबर डॉक्टरांची रिक्त पदे भरण्याची गरज आहे.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती,तापाचे, ऑर्थोपेडिक्स,साथ रोगांचे रुग्ण तपासणी साठी येतात.मात्र,त्या रुग्णांवर उपचार किंवा शस्त्रक्रिया करणेसाठी आयसीयू कमी आहेत.लहान मुलांच्या तपासणी नंतर उपचारासाठी यंत्र सामुग्री आवश्यक असल्याचे डॉ.धर्माधिकारी सांगताहेत,त्यानुसार आ.नितेश राणे यांनी आवश्यक मागणी प्रमाणे पूर्तता केली पाहिजे,असा टोला सुशांत नाईक यांनी लगावला.

आमच्याशी चर्चा करताना डॉ. धर्माधिकारी यांनी आता दिलेल्या कर्मचाऱ्यां बाबत काहीही सांगितले नव्हते.आ.नितेश राणे खासगी संस्थेमार्फत १२ कर्मचारी का देणार? राज्यात शासन तुमचे आहे.गेली ९ वर्षे काय करत होतात? आपल्या मतदार संघातील तुम्हाला आज समस्या समजल्या का? जनतेच्या प्रश्नावर आज जाग आली का? आता असलेले डॉ.धर्माधिकारी यांना तुमची शस्त्रक्रिया आम्हाला करायला लावू नका,अशी धमकी दिली.त्यामुळे या रुग्णालयात डॉक्टर येत नसल्याचा आरोप सुशांत नाईक यांनी केला.

आ.नितेश राणे यांनी मोठ्या दिमाखात कणकवलीत सुरु केलेले वायफाय कणकवलीची जनता अजूनही शोधतेय असा टोला लगावताना सुशांत नाईक म्हणाले, आम.नितेश राणे यांचे उपक्रम ही केवळ स्टंटबाजी आहे यापूर्वी सुरू केलेले औषध आपल्या दारी ,स्कुबा डायव्हिंग यासारखे उपक्रम आता दिसतात तरी का ?आमदारांनी हे प्रकल्प आणलेत ते कुठे आहेत? हे कर्मचारी ही वायफाय सारखे काही दिवसात गायब तर होणार नाहीत ना?आता रुग्णालयात खासगी कर्मचारी आणलात ते किती दिवस असणार आहेत?उपचार करताना या लोकांकडून चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमदार तुम्ही घेणार का?असा सवाल सुशांत नाईक यांनी केला आहे. आरोग्य यंत्रणेबाबतच्या अनास्तेबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे आम. नितेश राणे यांचे ऐकत नसतील तर तर युवा सेना प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याचे सुशांत नाईक म्हणाले.

You cannot copy content of this page