प्रमोद कांडरकर:महाविकास आघाडीच्या पाठपुराव्याला यश – प्रमोद कांडरकर
⚡मालवण ता.२३-: विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागत असल्याने याकडे शासनाचे लक्ष वेधल्यावर आता पाच वर्षांनी एकदा विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार असल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने शासनाकडे करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद कांडरकर यांनी म्हटले आहे.
विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना दाखल्यासाठी शासकीय विभागांचे उंबरठे झीजवावे लागत होते. त्यामुळे उत्पन्नाचा दाखला सादर करण्याचा कालावधी वाढवावा या मागणीसाठी गेले अनेक महिने महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. यासाठी मालवणचे तत्कालीन तहसीलदार अजय पाटणे व संजय गांधी निराधार योजना विभागाचे तत्कालीन अव्वल कारकून रघुनाथ मोंडकर यांचे सहकार्य लाभले. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि संजय गांधी निराधार योजना समिती मालवणचे तत्कालीन अध्यक्ष मंदार केणी यांच्यासह समिती सदस्य नंदिनी नाईक, रणजित राणे, सुनील पडते, उदय दुखंडे, भाऊ चव्हाण, अनुष्का गावकर, गणेश कुडाळकर यांचेही सहकार्य लाभले. महाविकास आघाडीच्या या पाठपुराव्याला यश येऊन शासनाने ज्येष्ठा लाभार्थ्यांना उत्पन्नाच्या दाखल्यासाठी पाच वर्षांची मुदत दिली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे दरवर्षी दाखल्यासाठी होणारे त्रास कमी होणार आहेत, असेही प्रमोद कांडरकर यांनी म्हटले आहे.
