राष्ट्रीय समृद्धी स्पर्धेत वराडकर हायस्कूलची उत्तुंग झेप…

कलाशिक्षक समीर चांदरकर व सिमरन चांदरकर यांचा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग..

⚡मालवण ता.०५-:
शिक्षा मंत्रालय भारत सरकार, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद NCERT नवी दिल्ली व राष्ट्रीय कला उत्सव अंतर्गत माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी आयोजित राष्ट्रीय समृद्धी कार्यक्रमात वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाचे कलाशिक्षक समीर अशोक चांदरकर व सहाय्यक शिक्षिका सिमरन समीर चांदरकर यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. दि. २७ ते २९ जानेवारी २०२६ या कालावधीत प्रादेशिक शिक्षण संस्था RIE भुवनेश्वर येथे संपन्न झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर निवड होणारी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव शाळा ठरली असून त्यांच्या या यशाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या स्पर्धेत भारतातील सर्व राज्यांमधील ६८ संघ सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्तरावर शिक्षकांमधील कौशल्य लक्षात घेऊन शिक्षकांसाठी आयोजित केलेली ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत विभाग व राज्यस्तरावर जवळपास ५००० शिक्षक सहभागी झाले. माध्यमिक स्तरावरील इयत्ता नववी ते बारावीसाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार अध्यापनातील कलेचे महत्त्व ओळखून कला एकात्मिकरण अध्यापन प्रक्रिये अंतर्गत (art pedagogy) भारतातील सर्व राज्यातील सहभागी शिक्षकांनी आपल्या विषयाचे सादरीकरण केले. अध्यापनातील कलेचे महत्त्व ओळखून अध्यापनाशी कलेची सांगड घालणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू होता. यामध्ये वराडकर हायस्कूलचे शिक्षक समीर चांदरकर व सिमरन चांदरकर यांनी पिंगुळी येथील पारंपारिक ठाकर आदिवासी कला, कळसुत्री बाहुल्यांच्या नाट्यीकरणाच्या माध्यमातून इयत्ता नववीचा किं मिथ्या? किं वास्तवम? या संस्कृत पाठाचे राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट सादरीकरण करून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव संपूर्ण भारतात उंचावले.

वराडकर हायस्कूलच्या शिक्षकांच्या या यशाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विशेष कौतुक होत आहे. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड.एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर तसेच सर्व संचालक व संचालिका वराडकर हायस्कूल कट्टाच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही अभिनंदन केले.

फोटो
भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय समृद्धी स्पर्धेत सहभागी झालेले वराडकर हायस्कूल कट्ट्याचे शिक्षक समीर चांदरकर आणि सिमरन चांदरकर व इतर

You cannot copy content of this page