विद्यार्थी बनले व्यापारी ; भंडारी प्राथमिक शाळेतील आठवडा बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.०५-:
ओ हयसर येवा… ताजी ताजी भाजी घेवा… सुके माशे घेवा… उकडे तांदूळ घेवा… लाडू घेवा… गारेगार सरबत घेवा… अशा आरोळ्या देत मालवणच्या भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेच्या पटांगणावर भरलेल्या आठवडा बाजारात व्यापारी बनलेल्या विद्यार्थ्यांनी ग्राहकांना आकर्षित केले. भंडारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी थाटलेल्या या बाजाराला ग्राहकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत खरेदी करून विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानाला प्रोत्साहन दिले.

भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण), मुंबई संचलित भंडारी प्राथमिक शाळेत ‘बाल आनंद मेळावा व आठवडी बाजार ‘ हा अभिनव उपक्रम पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान, गणिती कौशल्ये आणि आत्मविश्वासाची वृद्धी व्हावी, या उद्देशाने प्रशालेमध्ये प्रतिवर्षी ‘शालेय आठवडी बाजार’ हा अभिनव उपक्रम घेण्यात येतो. या आठवडी बाजाराचे उदघाटन संस्थेचे लोकल कमिटीचे सचिव दशरथ कवटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी लोकल कमिटी सदस्य विठ्ठल साळगावकर, भंडारी हायस्कुलचे मुख्याध्यापक हणमंत तिवले, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भूपेश गोसावी, शिक्षिक सौ. राधा दिघे, श्री. आर. बी. देसाई, सेवानिवृत्त कर्मचारी नंदकिशोर मळेकर, शिक्षक श्री. भोगले, शिक्षिका श्रीम.स्वाती दळवी, सौ.तृप्ती वालावलकर, सौ.योगिता तारी, माजी विद्यार्थी भूषण मेतर तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी एका दिवसासाठी व्यापाऱ्याची’ भूमिका साकारून प्रत्यक्ष खरेदी-विक्रीचा अनुभव घेतला. शाळेच्या प्रांगणात विविध प्रकारचे स्टॉल्स लावून एका छोट्या बाजारपेठेचे स्वरूप देण्यात आले होते. या बाजारामध्ये प्रामुख्याने ​ताजी फळे व भाज्या, हंगामी फळे, लाडू, चिवडा, उकडीचे मोदक, असे विविध घरगुती खाद्यपदार्थ, ​सुकी मासळी, उकडे तांदूळ, काजुगर व इतर मालवणी मेवा, थंडपेय, शालेय वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.

विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने आपल्या दुकानांची मांडणी करत केवळ विक्रीच नव्हे, तर पैशांचा हिशोब ठेवणे आणि ग्राहकांशी सौजन्याने बोलणे याचे उत्तम सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.​ या बाजारात शाळेतील शिक्षकांसह पालक व इतर ग्राहकांनी उपस्थित राहून खरेदी केली. पुस्तकी ज्ञानासोबतच मुलांना अशा व्यावहारिक अनुभवाची गरज असून भंडारी प्राथमिक शाळेचा हा उपक्रम स्तुत्य असल्याची भावना पालकांनी व ग्राहकांनी व्यक्त केली.

फोटो –

मालवण येथील भंडारी प्राथमिक शाळेत भरलेल्या आठवडा बाजाराचे श्रीफळ वाढवून उदघाटन करताना संस्था पदाधिकारी दशरथ कवटकर, सोबत विठ्ठल साळगावकर, हणमंत तिवले, भूपेश गोसावी व इतर.
(छाया – भूषण मेतर)

फोटो –
मालवण येथील भंडारी प्राथमिक शाळेत भरलेल्या आठवडा बाजारात विद्यार्थ्यांकडून विविध वस्तू खरेदी करताना ग्राहक.
(छाया – भूषण मेतर)

You cannot copy content of this page