गुगलवरून नातेवाइकांचा शोध घेत मतिमंद मुलीला दिले ताब्यात

जीवन आनंद संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी

⚡कुडाळ ता.२२-: जीवन आनंद संस्था रस्त्यावरील निराधार, वंचित आणि मानसिक आजारी व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ८ महिन्यांपूर्वी मुंबईहून गोव्याला गेलेल्या रविना खंडारे (वय २४ वर्षे) या मतिमंद मुलीला नुकतेच गुगलवरून तिच्या कुटुंबाचा शोध घेऊन पुन्हा एकत्र आणले.

यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक सचिव संदीप परब म्हणाले की, “देशातील शहरांमध्ये शारीरिक व मानसिक आजारांनी ग्रासलेले रस्त्यावरील असंख्य निराधार व वंचित व्यक्ती हे आपले बांधव आहेत. त्यांच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी नेणे हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे.”

१९ नोव्हेंबर २०२३ रोजी म्हापसा पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकारी रिचा भोसले यांनी रविना खंडारे हिला म्हापसा येथून ताब्यात घेवून तिला म्हापसा (गोवा) येथील जीवन आनंद संस्थेच्या संवेदना आश्रमात निराधार व गंभीर मानसिक रुग्णावस्थेत ताब्यात घेऊन जीवन आनंद संस्थेच्या म्हापसा येथील संवेदना आश्रमात दाखल केले होते.

मागील सहा-सात महिने म्हापसा येथील संवेदना आणि नंतर कुडाळ सिंधुदुर्ग येथील जीवन आनंद संस्थेच्या संविता आश्रमात उपचारानंतर रवीनाची मानसिक प्रकृती हळूहळू ठीक झाली. आजारातून बरे झाल्यानंतर तिने आश्रमातील सेवक कार्यकर्त्यांना तिच्या यवतमाळ जिल्ह्यातील पळशी तालुका दारवहा या गावाचे नाव सांगितले.

गुगलच्या माध्यमातून विविध पद्धती वापरून संस्थेच्या कार्यकर्त्यांनी रविनाच्या गावातील काकांशी संपर्क साधला. काकांनी मुंबईतील कुटुंबीयांचा नंबर दिल्यानंतर रविनाचा तिच्या भावाशी राज खंडारे याच्याशी संपर्क झाला.
आज जीवन आनंद संस्थेचे संस्थापक सचिव संदीप परब यांच्या उपस्थितीत सांताक्रूझ पूर्व वाकोला येथील कार्व्हर डे नाईट शेल्टर येथे रविना हिची ओळख पटवून तिचे भाऊ राज खंडारे यांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त किसन चौरे, प्रसाद आंगणे, लीना पालकर हे कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page